कोल्हापूर शहरात टोल आकारण्यावर आणलेली स्थगिती राज्य सरकारने उठवल्याच्या वृत्तानंतर कोल्हापूरमध्ये टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी फुलेवाडी येथील टोल नाक्याची केबीन पेटवून दिली, तर उचगाव व सरनोबतवाडी येथील टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली. मनसेचे नेते राज ठाकरे हे २ मे रोजी सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.    
कोल्हापूर शहरामध्ये टोलवसुली करण्यास नागरिकांतून जोरदार विरोध होत आहे. टोल विरोधी कृतीसमितीच्या माध्यमातून आक्रमक रणनीती ठरविली जात आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरूध्द आवाज संघटित करण्याचे काम कृती समिती करत आहे. याच आंदोलनात मनसे सोमवारी रात्री स्वतंत्रपणे उतरली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मनसेच्या शंभरावर कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून जात अचानक टोल नाक्यांवर हल्लाबोल चढविला.
प्रथम फुलेवाडी येथील टोल नाक्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना विरोध दर्शविला. त्यातून दोघांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी टोल आकारणीसाठी बांधलेल्या केबीनची मोडतोड केली व त्यावर पेट्रोल ओतून ते पेटवून दिले. या वेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आयआरबी कंपनी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. सरनोबतवाडी व उचगाव येथील टोल नाक्यांचीही मोडतोड करण्यात आली.

शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न
राज ठाकरे हे दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला येथील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली टोल नाके पेटवून दिले होते. तर, पुन्हा एकदा टोल आकारणी होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यावर आमदार क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा टोल नाके पेटवून देण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कोल्हापुरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाके पेटवून देऊन आमदार क्षीरसागर यांना शह देण्याचा प्रयत्न केला.