औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एका विवाहित महिलेची छेड काढून तिला त्रास दिला जात असल्याची तक्रार मकरंद कुलकर्णींविरोधात नोंदवण्यात आली. त्यानुसार सिडको पोलिसांनी गटनेते मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला सिडको भागातच राहते. गेल्या सहा महिन्यांपासून सिडको एन ८ भागातील शिवसेना नगरसेवक मकरंद कुलकर्णी सतत महिलेचा पाठलाग करायचा. तिला अडवून छेड काढायचा. मात्र, बदनामीच्या धास्तीने पीडित महिलेने तक्रार केली नाही. मात्र त्रास सातत्याने वाढल्याने अखेर या महिलेने पोलीस ठाणे गाठले.

पीडित महिला योगाचा तर तिची मुलगी टेनिसचा क्लास करत होती. गुरुवारी संध्याकाळी मुलगी क्‍लासला येणार नाही, हे सांगण्यासाठी पीडित महिला मुलीच्या सरांकडे गेली. त्यावेळी आरोपी नगरसेवक मकरंद कुलकर्णीने अडविले. आपण तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, असेही या पीडितेने सांगितले.

‘तू काहीही केले तरी मी तुला सोडणार नाही’ असे म्हणत आरोपीनं अश्‍लील वर्तन केल्याचं पीडितेने म्हटले आहे. आरडाओरड केली. तेव्हा मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने मकरंद कुलकर्णीने तेथून दुचाकीवरून पळ काढल्याचे म्हटले आहे. नगरसेवकाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पतीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादी वरून आरोपी नगरसेवक मकरंद कुलकर्णी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून पीडितेसह तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचं तक्रारीत म्हटले आहे.