नागपूरमध्ये बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांची वेशभूषा चर्चेचा विषय ठरली. आ. गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधिमंडळात आले होते. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी गजभिये यांनी ही वेशभूषा केली होती. निषेध म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आंब्यांचे वाटपही केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधिमंडळ परिसरात दाखल झाले. संभाजी भिडे यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

छाया सौजन्य: मोनिका चतुर्वेदी

संभाजी भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी प्रकाश गजभिये यांनी अनोखी शक्कल लढवली. प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधिमंडळात पोहोचले. सरकारवर टीका करताना गजभिये म्हणाले की, ‘संभाजी भिडे यांच्याविरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्य सरकार लोकांना न्याय देण्यात कमी पडत आहे’. आंधळ्या, मुकबधीर सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आलो आहोत, संभाजी भिडे यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.