प्रदीप नणंदकर

या वर्षी पहिल्यांदाच शेतकऱ्याचा  माल बाजारपेठेत येताना बाजारपेठेतील भाव हमीभावाच्या आसपास असल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर शुकशुकाट राहणार असून भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाची भावना आहे. कायम हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यायची. या वर्षी पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी चांगली स्थिती आहे.

दरवर्षी प्रत्येक शेतमालाचे भाव माल बाजारपेठेत आला की पडतात व मागणी घटली की भाव वाढतात. या वर्षी सोयाबीनचा हमीभाव ३८८०  असून बाजारपेठेतील भाव तीन हजारच्या खाली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. सोमवारी बाजारपेठेतील सर्वसाधारण भाव ३८०० रुपये होता. किसान वेअर हाऊस येथे ३९५० रुपये क्विंटलने सोयाबीनची खरेदी चालू असल्याचे संचालक हेमंत वैद्य यांनी सांगितले, तर कीर्ती ऑइल मिलवर ४१०० रुपये दराने खरेदी सुरू असल्याचे संचालक अशोक भुतडा यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ातच सोयाबीनचे हे भाव आहेत. बाजारपेठेत सध्या दररोज सुमारे ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. या वर्षी पावसाने मध्य प्रदेशाबरोबरच महाराष्ट्राच्या उत्पादनातही घट झाली. त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत आहेत. हे भाव आणखीन वाढून चार हजारांच्या वर यावर्षी सोयाबीनचा भाव वाढेल, असा बाजारपेठेचा अंदाज आहे. सोयाबीनचे भाव वाढत असल्याने यावर्षी दसरा व दिवाळी हे सण शेतकऱ्यांसाठी आनंदाचे ठरणार आहेत.

गेल्या चार वर्षांत चार हजारांच्या वर भाव सोयाबीन उत्पादकांना मिळालेले नव्हते व दरवर्षी उत्पादनाचा खर्च मात्र वाढत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. हरभऱ्याच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. केंद्र सरकारने नवीन हंगामासाठी रहभऱ्याचा हमीभाव ५१००  रुपये क्विंटलचा जाहीर केला आहे. सध्या लातूर बाजारपेठेत हरभऱ्याचा भाव ५५००  ते सहा हजार रुपये क्विंटल आहे. बाजारपेठेत नवीन तूर येण्याला आणखीन महिना लागेल. तुरीचा हमीभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजारपेठेतील सध्याचा भाव ७५००  ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. मूग व उडीद यांचे भावदेखील हमीभावापेक्षा एक हजार रुपयाने अधिकच आहेत. या वर्षीचा हंगाम हा शेतमालाचे चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना  दिलासा देणारा आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या चार-पाच वर्षांपासून केंद्र सरकारने जी कृषी धोरणे राबवली, आयातीवर मर्यादा घातल्या, आयातकर आकारले, आयात-निर्यातीच्या धोरणात बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घेण्याची लवचीकता ठेवली. हमीभावापेक्षा बाजारपेठेतच शेतकजयांना अधिक भाव मिळाला पाहिजे, असे धोरण आखले जाणार आहे, असे सांगितले जात होते. पहिल्यांदा याची प्रचीती बाजारपेठेत दिसते आहे. लातूर जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांना शासनाच्या खरेदी केंद्राच्या तयारीसंबंधी विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांचा शेतमाल आम्ही जाहीर केलेल्या हमीभावाने व निकषानुसार खरेदी करण्याची आमची तयारी पूर्ण असून सर्व खरेदी केंद्रांवर यंत्रणा सज्ज आहे. बाजारपेठेत शेतकऱ्याला भाव कमी मिळत असतील तरच ते आमच्याकडे येतील. परिस्थितीत कधीही बदल होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही आमची तयारी पूर्ण केली असल्याचे ते म्हणाले.