ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर झोन मध्ये पर्यटनाला सुरूवात होताच, हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आहे. आज सर्व ११ प्रवेशद्वारांमधून ६० जिप्सीतून २४० पेक्षा अधिक पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. दरम्यान, वन जमिनीवरील अतिक्रमणामुळे आगरझरी, तर करोना संसर्गाच्या भितीने मदनापूर असे दोन प्रवेशद्वार अद्याप बंद आहेत.

ताडोबा प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये १ जुलै पासून पर्यटनाला सुरूवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी १२ जिप्सीतून ५२ पर्यटकांनी बफर झोनमध्ये जंगल सफारीचा आनंद घेतला. करोनाच्या टाळेबंदीमुळे पर्यटनाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता संरपंचाची मागणी बघता मदनापूर व कोलारा या ठिकाणच्या ग्रामस्थांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही प्रवेशद्वार ताडोबा व्यवस्थापनाने बंद केले. कालांतराने कोलारा प्रवेशद्वार आता सुरू करण्यात आले आहे. दरम्यान आता पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढायला सुरूवात झाली आहे.

ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी ताडोबा बफर क्षेत्राच्या सर्व ११ प्रवेशद्वारातून सकाळ व दुपारच्या सत्रात ६० जिप्सी मधून २४० पेक्षा अधिक पर्यटकांनी प्रवेश केला. या सर्व पर्यटकांनी करोना नियमावलीचे पालन करत जंगल सफारीचा आनंद घेतला. मागील दहा दिवसात पर्यटकांची ही सर्वाधिक संख्या होती. हळूहळू पर्यटकांची संख्या वाढेल असेही ते म्हणाले.

दरम्यान, पावसामुळे रस्ते खराब झाल्याचे कारण समोर करत तीन दिवसांपूर्वी आगरझरी प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. ताडोबा व्यवस्थापन रस्त्याचे कारण समोर करित असले, तरी वन जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून ताडोबा व्यवस्थापन व ग्रामस्थ समोरा-समोर आले आहेत. त्यावरून वादही सुरू आहे. हा वाद विकोपाला जावू नये म्हणून आगरझरी प्रवेशद्वार बंद केले आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी काही जिप्सी चालकांचेच वन अतिक्रमण असल्यामुळे आगरझरी प्रवेशव्दार बंद केल्याची माहिती दिली. सध्या तात्पूरत्या स्वरूपात आगरझरी बंद आहे. जिप्सी चालकांनी अतिक्रमण मोकळे करताच प्रवेशव्दार सुरू करू असेही ते म्हणाले.