यंदा फक्त ५६ टक्के नोंदणी; ट्रॅक्टर निम्म्यावर, रुग्णवाहिका दुप्पट

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : सन २०१९-२० या आर्थिक वर्षांत पालघर जिल्ह्य़ात ७३ हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली असताना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या वाहन नोंदणीच्या तुलनेत यंदा फक्त ५६ टक्के नवीन वाहने नोंदविली गेली आहेत. एकंदरीत या नोंदणीला करोना प्रादुर्भाव आणि त्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीचा फटका बसल्याचे दिसून येते.

करोनाकाळात टाळेबंदी लागू केल्याने सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. वाहन उद्योग क्षेत्रही त्यातून सुटू शकले नाही.  टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर रेल्वे प्रवासास बंदी असलेले नागरिक वाहन खरेदी करतील असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील नव्याने खरेदी झालेल्या वाहनांची संख्या तुलनात्मक निम्म्यावर राहिल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या वाहन नोंदणीच्या तुलनेत यंदा ट्रक्टर, बस, तीन चाकी वाहने यांची खरेदी फारच कमी प्रमाणात झाली आहे. मात्र, रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याचे दिसते.

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या गेल्या आर्थिक वर्षांत ७३ हजार ३२४ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ५५ हजार २५३ दुचाकी, १३५ मोपेड, ६७९८ मोटार, ७०४ मोटर कॅब, ४५७६ गुड्स कॅरिअर,१४३ ट्रॅक्टर, ४३ रुग्णवाहिका व इतर वाहनांचा समावेश आहे.

यंदा नोव्हेंबर झालेल्या वाहन खरेदी व नोंदणी प्रक्रियेत २१ हजार दुचाकी, ४०४८ मोटार, १०७ मोटार कॅब, ४०० थ्री व्हीलर, ९८६ गुड्स कॅरिअर, ६० ट्रॅक्टर, ३४ रुग्णवाहिका, २४ बसगाडय़ांचा समावेश आहे. बांधकाम व्यवसायात लागणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात असून करोनाकाळात झालेली बांधकाम क्षेत्रातील वाहने, डंपर यांचीदेखील कमी प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले आहे.

एकीकडे इलेक्ट्रिक वाहनासाठी शासन प्रोत्साहन देत असताना विद्यमान वर्षांत जेमतेम चार ई-रिक्षांची विक्री झाल्याचे दिसून आले आहे. इतर वाहनांच्या खरेदीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट दिसून आलेली असली तरीसुद्धा चारचाकी वाहनांच्या झालेल्या विक्रीची संख्या गतवर्षीच्या तुलनेत जवळपास झाल्याचे दिसून आले आहे.

परिवहन विभागातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा शिबिरांमध्ये खासगी वाहन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  मात्र करोनाकाळात नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले असून त्याचा फटका वाहन खरेदीवर झाल्याचे दिसून आले आहे.

आठ महिन्यांतील वाहन खरेदी

वाहन         एप्रिल-नोव्हेंबर   एप्रिल- नोव्हेंबर 

२०१९                 २०२०

ट्रॅक्टर               ११४                  ६१

रुग्णवाहिका     १९                     ३४

बस                   ९९                   २४

गुड्स कॅरीअर    ३०१९               ९८६

दुचाकी             ३५३९४              २०९९९

मोटार             ४९२७                 ४१५५

तीनचाकी        ३६८२                 ४१८