लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : अकोला जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण रुग्ण संख्येने गुरुवारी नऊशेचा टप्पा ओलांडला आहे. आज ३० नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या ९१४ वर पोहचली. शहरात करोनामुळे आणखी एकाचा बळी गेल्याने जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या ४३ झाली आहे. सध्या २९४ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील करोना रुग्णांची व मृत्यूची संख्या अद्याापही नियंत्रणात आली नाही. आणखी एक मृत्यू व ३० नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी झाली. जिल्ह्यातील एकूण १३८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १०८ अहवाल नकारात्मक, तर ३० जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या नऊशे पार जाऊन तब्बल ९१४ झाली. आतापर्यंत एकूण ४३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. त्यापैकी एकाने आत्महत्या केली. आतापर्यंत ५७७ जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, उपचारादरम्यान काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. हरिहर पेठ भागातील रहिवासी ७६ वर्षीय रुग्णाला ३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. काल रात्री उपचार सुरू असतांना ते दगावले.

आज सकाळच्या अहवालानुसार २८ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये १० महिला, तर १८ पुरुषांचा समावेश आहे. यात पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, वाडेगाव इंदिरा नगर, तारफैल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण, तर दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फैल, जीएमसी वसाहत, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फैल, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड व जुने शहर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालात आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने आज दिवसभरात एकूण ३० रुग्ण आढळून आले. त्या दोनमध्ये महिला व पुरुष प्रत्येकी एक असून ते मोहतामिल रोड आणि जुने शहर भागातील रहिवासी आहेत. करोनाबाधित आढळून आलेले परिसर तात्काळ प्रतिबंधित करून संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. शहरात घरोघरी सव्र्हेद्वारे आरोग्य तपासणी सुरू आहे. अकोल्यात मृत्यूचे प्रमाण व सातत्याने रुग्णवाढ होत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.

दाखल रुग्ण संख्या तीनशेच्या उंबरठ्यावर
अकोला शहरासह ग्रामीण भागामध्येही करोना हातपाय पसरतो आहे. वाडेगावमधील रुग्ण संख्या आजही वाढली. शहरात करोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांची संख्येत भरमसाठ वाढ होऊन ती तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचली. सध्या २९४ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत्यूचे प्रमाण वाढले
अकोल्यात करोनामुळे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. गत काही दिवसांमध्ये दररोज करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ जणांचे मृत्यू झाले असून, त्यापैक एक आत्महत्या वगळता करोनामुळे ४२ जणांचे बळी गेले. जिल्ह्यात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण ४.६० टक्क्यांवर पोहचले. महाराष्ट्राच्या तुलनेत अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.