सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे एका शेतातील विहिरीत दीड वर्षांच्या बालकासह मातेचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार आत्महत्येचा की घातपाताचा आहे, हे लगेच स्पष्ट झाले नाही. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे. विश्रांती पप्पू मोरे (वय २५, रा. भोसे, ता. मंगळवेढा) व तिचा मुलगा प्रतीक (वय दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मृत विश्रांती हिचे वडील शिवाजी दत्तू दोडके (रा. भाळवणी, ता. मंगळवेढा) यांनी यासंदर्भात पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार त्यांची विवाहित मुलगी विश्रांती ही रात्री दहाच्या सुमारास कचरेवाडी येथे कट्टे गुरुजींच्या शेतातील राहत्या घरातून अज्ञात कारणावरून मुलासह निघून गेली. ती नंतर घराकडे परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही. दरम्यान, तेथे जवळच असलेल्या विहिरीत दुसऱ्या दिवशी रात्री मुलासह तिचा मृतदेह आढळून आला.

तरुणाचा खून

सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसीजवळ विनायकनगरात एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी त्याच्या तिघा मित्रांना अटक करण्यात आली आहे. दारू प्राशन केल्यानंतर झालेल्या भांडणात हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. विकास भगवान जेटीथोर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे मित्र प्रभाकर चौगुले (रा. विजयालक्ष्मीनगर, जमादार वस्ती, सोलापूर), धम्मपाल राजेंद्र सुरवसे व अजित ऊर्फ अज्जू हाफीज शेख (रा. कमलाकर नगर, कुमठानाका, सोलापूर) यांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. बिगारी काम करणारे मृत विकास जेटीथोर याच्यासह त्याचे मित्र असलेल्या संशयित मारेकऱ्यांनी गेल्या २० फेब्रुवारी रोजी रात्री कुमठा नाका परिसरात एकत्र बसून दारू प्राशन केली होती. नंतर ते विनायकनगरात गेले. तेथे दारूच्या नशेत झालेल्या भांडणात विकास जेटीथोर यास मारहाण झाली होती. डोक्याला व पायांना जबर दुखापत झाली, तरी विकास हा रात्रभर रस्त्यावर तसाच पडून होता. दुसऱ्या दिवशी त्याला जखमी अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, उपचारादरम्यान विकासचा मृत्यू झाला.