मराठा आरक्षणाचे आश्वासन आघाडी सरकारने पाळले नाही. त्यामुळे निवडणुकीत शिवसंग्राम संघटना सरकारविरुद्ध काम करेल, असा इशारा देत राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी पक्षाविरुद्ध उघड बंड पुकारले. शिवसंग्रामच्या बठकीला जिल्हय़ातील पक्षाचे आमदार  बदामराव पंडित हेही उपस्थित होते. मात्र, आपण पक्षासोबत राहणार असल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी स्पष्ट केले असले, तरी पक्षाचे अन्य ३ माजी मेटेंच्या संपर्कात आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसंग्रामच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बीडमध्येच बसण्याची शक्यता वर्तवली जाते.
पक्ष नेतृत्वालाच आव्हान देणाऱ्या मेटे यांना राष्ट्रवादीने शिस्तभंगाची नोटीस बजावली. या पाश्र्वभूमीवर मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बठक घेऊन सरकारविरुद्ध काम करण्याचा निर्णय घेतला. मेटे महायुतीबरोबर जाणार की अन्य काही पर्याय निवडणार याचा निर्णय पुढील काही दिवसांत होणार आहे. पण सरकारविरोधी भूमिकेचा फटका देण्यासाठी मेटे यांनी जिल्हय़ातील नाराजांची साथ मिळवण्याचा प्रयत्न चालविला आहे. याचा भाग म्हणून शिवसंग्रामच्या बठकीला गेवराईचे राष्ट्रवादी आमदार पंडित उपस्थित होते. मात्र, पंडित यांनी लागलीच आपण पक्षाबरोबरच असून, आरक्षण मागणीसाठी केवळ शिवसंग्रामच्या व्यासपीठावर गेलो असल्याचा खुलासा केला. परंतु गेवराईतील बदलत्या राजकीय गणितामुळे पंडित काय भूमिका घेतात, याचीही उत्सुकता तयार झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासूनच शिवसंग्रामच्या व्यासपीठावर दिसणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे व आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर हे मेटे यांच्या भूमिकेबरोबर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.