कोल्हापूर—मुंबई दरम्यान अनियमित सेवा

कोल्हापूर : कोल्हापूर—मुंबई मार्गावरील अनियमित विमान सेवा देणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला  काळ्या यादीत टाकावे आणि सक्षम कंपनीकडून कोल्हापूरची विमान सेवा चालू ठेवावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी लोकसभेत केली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेच्या शून्य प्रहरात महाडिक यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या विमान सेवेचा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान शहरांना मोठय़ा शहरांशी जोडण्यासाठी सन २०१५ मध्ये उडान योजना आखली. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश झाल्याने ६ वर्षे खंडित असलेली विमान सेवा सुरू झाली.

या वर्षी १७ एप्रिलला एअर डेक्कन कं पनीकडून कोल्हापूर—मुंबई— कोल्हापूर या मार्गावर विमान उड्डाण होऊ लागले.

पहिले दोन महिने ही विमान सेवा नियमित  सुरू होती. जवळपास ९० टक्के आणि पुढील तीन महिन्याचे आरक्षण होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम असायचा. तरीही एअर डेक्कन कंपनीने कोणतेही सयुक्तिक कारण न देता अचानक ही विमान सेवा बंद केली. त्यामुळे पर्यटक, भाविक, उद्योजक यांची कुचंबणा झाली.

बेभरवशाची विमान सेवा देणार्या एअर डेक्कन कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि स्पाईस जेट किंवा इंडिगो यासारख्या विमान कंपनीला कोल्हापूर—मुंबई सेवा देण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.