जागावाटपाबाबत तोडगा निघाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाआघाडीत न जाता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.  जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी नाराज आहेत. परिणामी शेट्टी ‘एकला चलो रे’ चा नारा देण्याची शक्यता आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीने स्वाभिमानीला सहा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील तीन जागांवर शेट्टी ठाम होते. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागा शेट्टींनी मागितल्या होत्या. राजू शेट्टी यांनी बुलढाण्याची जागा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी तर वर्ध्याची जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी मागितली होती. मात्र याबाबत ठोस काही चर्चा झाली नसल्याने राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची तयारी केली आहे. महाआघाडीत न जाण्याच्या भूमिकेनंतर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नऊ जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली आहे.

येत्या आठवडाभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून राजू शेट्टींना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लोकसभा निवडणुकीची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात येत्या चार पाच दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.