खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

परभणी : मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मारक मुंबईत उभारण्याची घोषणा केली होती. स्मारक तर झाले नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली. सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा राहिला. मुख्यमंत्री मात्र यात्रा व जत्रा करण्यात मग्न होते. पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी एक दिवसही ते थांबले नाहीत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी केला.

जिंतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, सारंगधर महाराज, अजय चौधरी, अविनाश काळे, बाळासाहेब भांबळे, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्षा भावना नखाते, नगराध्यक्षा साबिया बेगम फारूखी, पं. स. सभापती इंदुताई भवाळे आदींची उपस्थिती होती.

आघाडी सरकारने २०१२ मध्ये शून्य टक्के दराने बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भाजप सरकारच्या काळात साधे कर्ज मिळणेही मुश्कील झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारामुळे महिलांना आरक्षण मिळाले असून आज आरक्षणाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

निवडणुका जवळ येताच काही राजकारणी मंडळी कारखाना, सूतगिरणी उभारण्यासह युवकांना नोकऱ्या  देण्याचे आमिष दाखवतात. एवढेच नाही तर आमदार होण्यासाठी काही राजकारणी लोकांच्या विम्याचे पैसेही खातात, असा आरोप आमदार भांबळे यांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे नाव न घेता केला. गेली २५ वर्षे छत्रपती शिवरायांच्या नावावर मते मागणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र उभारला नाही. जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघात २५०० महिला बचतगट असून गेल्या पाच वर्षांत भाजपा सरकारकडून केवळ ३०० बचत गटांना १५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. कर्ज मागण्यासाठी जाणाऱ्या महिला बचतगटांना बँक कर्ज मंजूर करीत नाही. त्यामुळे ४८ तासांत स्वाभिमानाने महिलांना कर्ज मिळण्यासाठी कायदा करण्यासाठी खासदार सुळे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही आमदार भांबळे यांनी केली.

या वेळी आमदार दुर्राणी, सारंगधर महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आमदार भांबळे यांच्या कन्या प्रेक्षा यांनी केले. या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मनोज थिटे, प्रसाद बुधवंत, महिला तालुकाध्यक्षा मनीषा केंद्रे आदीसह पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हीच खरी ताकद

हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडझडीवर माध्यमातून बरीच चर्चा आहे. मात्र, कुणी पक्ष सोडल्याने पक्षाचे नुकसान होत नाही. पक्ष पशांच्या ताकदीवर उभा राहत नाही. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हीच ताकद असते. ही ताकद आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकत्रे दाखवून देतील, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस त्यांनी वसमत मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध व्यावसायिकांशी संवाद साधला.

जवळा बाजार येथील जाहीर सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणावर जोरदार टीका केली. आज सत्तेत असलेली ही मंडळी शरद पवार कृषिमंत्री असताना गळ्यात कांद्याच्या माळा घालून महागाईचा निषेध करत होती. त्यांच्याच काळात आता कांदे, दूध रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. शेतमालाला हमीभाव देतो, अशी घोषणा केली होती. ते देणे तर दूरच, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतीचे अर्थकारण बिघडले आहे. शेतकरी आत्महत्या करू लागल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकार केवळ घोषणाबाजी करते, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सुधारणा करून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जनतेच्या करातून सरकारच्या तिजोरीत पसा उभा राहतो. मात्र, त्याचा उपयोग हे सरकार जाहिरातीवर करते आहे. आतापर्यंत पाच हजार कोटी रुपये जाहिरातीवर खर्च झाले आहेत. राज्यात दोन पक्षांची सत्ता असताना जाहिरातीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असते, सत्तेत सहभागी असलेल्या व वाघाच्या डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेला त्याचा राग का येत नाही, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी उपस्थित केला. एकीकडे जाहिरातीवर कोटय़वधींचा खर्च होतो तर दुसरीकडे शिक्षक, अंगणवाडी सेविका, विविध विभागातील कर्मचारी वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे त्रस्त असल्याचे त्या म्हणाल्या.

‘केवळ पशांच्या जोरावर पक्ष उभा राहत नाही, तर कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हीच खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद असते, आज ७५ ते ८० वय झालेल्या नेत्यांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी इतर पक्षाच्या दारात जाऊन मुजरा करावा लागतो. काही नेते ईडी, सीबीआय, बँक, कारखाने याच्या भीतीपोटी कपडे बदलावेत, त्याप्रमाणे पक्ष बदलत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.