महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी मुख्य परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. जाकापुरे यांनी संपूर्ण राज्यात पहिल्या क्रमांक पटकावत नांदेडकरांची शान राखली आहे. ही परीक्षा ७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. याबरोबरच मागासवर्गीय प्रवर्गातून ठाणे जिल्ह्यातील प्रमोद केदार तर महिला प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर हे पहिले आले आहेत.

या परीक्षेला राज्यभरातून एकूण ४ हजार ४३० विद्यार्थी बसले होते. त्यातील २५१ विद्यार्थ्यांची एसटीआय पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेत शिवाजी जाकापुरे यांना १५६, प्रमोद केदार यांना १४८ तर शीतल बंडगर यांना १४१ गुण मिळाले आहेत. परीक्षेला बसलेले विद्यार्थी आपला निकाल mpscच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात असे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीन पदांसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ विद्यार्थी बसले होते. त्यातून ४ हजार ४३० जणांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची असले त्यांनी १० दिवसांत अर्ज दाखल करता येईल असे आयोगाच्या पत्रकात म्हटले आहे.