गेल्या दोन वर्षांपासून सरकारने आमची पिळवणूक केली, सरकारने दखल न घेतल्याने मराठा समाज नाराज झाला आणि आता मूक मोर्चा नव्हे तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्मबलिदान करण्यापर्यंत हे आंदोलन पोहोचले. सरकारनेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरवले असून हातात दगड, काठी घेण्यासाठीही सरकारनेच भाग पाडले, असा आरोप मराठा मोर्चा समन्वयकांनी केला.

मुंबईत मराठा मोर्चा समन्वयकांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वीरेंद्र पवार यांनी बंद स्थगित करत असल्याचे सांगितले. मंगळवारी वारीतील दिवस होता. म्हणून आज (बुधवारी) मुंबई, ठाणे, रायगड आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली. मुंबई फक्त राजकीय पक्षाकडून बंद केली जाते, अशी एक धारणा होती. मात्र, समाज देखील मुंबई बंद पाडू शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

सरकारने गेल्या दोन वर्षात मराठा समाजाची पिळवणूक केली. अखेर समाजाने मूक मोर्चा नव्हे तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आत्मबलिदानापर्यंत हे प्रकरण पोहोचले. सरकारनेच समाजाच्या हातात काठी आणि दगड दिले. आज सरकारने हा समाज रस्त्यावर उतरवला, असे त्यांनी सांगितले.