नाताळच्या सुटीला जोडून शनिवार- रविवारची सुटी आल्याने वीक एन्डला बाहेर फिरायला जाणाऱ्या मुंबईकरांना शनिवारी सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडीच्या अग्निदिव्यातून पार पडावे लागत आहे. कळवा ते विटावा मार्ग बंद असल्याने नवी मुंबईहून ठाण्याला जाणाऱ्या वाहनांना ऐरोली- मुलुंडमार्गे ठाणे गाठावे लागत असल्याने तिथे वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ पुण्याच्या दिशेने मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

कळवा ते विटावा दरम्यान रेल्वेपुलाखाली पडलेले खड्डे बुजविण्याचे काम ठाणे महापालिकेने शुक्रवारपासून हाती घेतले. यासाठी पटनी कंपनीपासूनच वाहतूक बंद करण्यात आल्याने नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना ऐरोली आणि पुढे मुलुंडमार्गे ठाणे गाठावे लागत आहे. यामुळे ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरील वाहनांचा भार वाढला असून टोलमुळे कोंडीत भर पडत असल्याने चार दिवस टोलमाफी का करत नाही, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.

नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मुलुंड-ऐरोली पुलाचा वापर करणाऱ्या वाहनांना ऐरोली आणि मुलुंड येथे दोन वेळा पथकर भरावा लागतो. त्यामुळे नवी मुंबईतून मुंबई-नाशिक आणि घोडबंदर, ठाणे आणि पुढे मुंबई-अहमदाबाद मार्गावर जाण्यासाठी बहुतांश वाहनचालक कळवा-साकेत मार्गाचा वापर करतात. मात्र कळवा- विटावा मार्ग बंद केल्याने या मार्गावरील सर्व वाहनांना आता दोन वेळा टोल भरावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप आणि  टोलचा जाच अशा कात्रीत वाहनचालक अडकले. मुंबईबाहेर जाणाऱ्या सर्वच महामार्गांवर असेच चित्र दिसत आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरही वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर वळवण्यात आली आहे. एकीकडे रस्त्यावर वाहतूक कोंडी असताना नवी मुंबईकरांना रेल्वे प्रवासातही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईला उरणशी जोडणाऱ्या सीवूड-उरण या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या विविध कामांसाठी हार्बरवर सोमवापर्यंत ब्लॉक घेण्यात आला असून पहिल्याच दिवसापासून त्यासाठी काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.