शिवसेनेच्या ठिय्या आंदोलनादरम्यानची घटना

कार्यारंभ आदेश देऊनही राजकीय दबावातून रस्त्याचे काम सुरु केले जात नाही, दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर महापालिका कारवाईही करत नाही, याचा निषेध करण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यानच आयुक्तांच्या दालनात शहर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनपाचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारला, मात्र सोनटक्के यांनी तो चुकवला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान सोनटक्के यांच्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरु होती.

नागापूर उपनगरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे, अक्षय कातोरे, मदन आढाव, शैलेश भाकरे यांच्यासह नागरिकांनी दुपारी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. नंतर आंदोलकांनी शिवसेना माजी आमदार अनिल राठोड यांनाही पाचारण केले, तेही अन्य कार्यकर्त्यांसह तेथे आले. ते उपस्थित होताच आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काम रखडल्याबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. काही कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी अर्वाच्च भाषाही वापरत होते. राठोड यांनीही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

ही वादावादी सुरु असतानाच शिवसेनेचे पदाधिकारी  मदन आढाव यांनी शहर अभियंता सोनटक्के यांच्या दिशेने बूट फेकून मारला. तो सोनटक्के यांनी हुकवला. या घटनेमुळे गोंधळ उडाला. यापूर्वी नगरसेवक व नागरिकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नागापूर येथील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक हा रस्ता ठेकेदाराने गेल्या ६ महिन्यापासून खोदून ठेवला आहे. रस्त्याच्या कामाकडे ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. कामाचा कार्यारंभ आदेश गेल्या ३ महिन्यांपूर्वीच देण्यात आला, काम मार्गी लावण्यासाठी नागापूर, बोल्हेगाव परिसरातील नागरिकांनी आयुक्त, उपआयुक्त, महापौर यांना वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलनाचा इशाराही दिला, मात्र रस्त्याचे काम मार्गी लागले नाही.

रस्त्याचे काम रखडल्याने रहदारीचे प्रमाण कमी झाले, अनेक अपघातात नागरिक जखमी झाले, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी, दुकानदार हैराण झाले आहेत, परिसरात धुळीचे साम्राज्य पसरते आहे. ठेकेदार नगरसेवकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालीत आहे. ठेकेदारही पक्षीय मतभेद करु न काम टाळत आहे. त्यामुळे ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. कामे होणार नसतील तर नगरसेवक राजीनामे देतील असा इशाराही या वेळी देण्यात आला.

अभियंते बेमुदत रजेवर

महापालिकेत घडलेला प्रकार निंदनीय व लांच्छनास्पद असल्याने संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा व आरोपींना अटक होईपर्यंत सामूहिक बेमुदत रजेवर जात असल्याचे निवेदन मनपातील अभियंत्यांनी मनपा आयुक्त भालसिंग यांना दिले आहे. व्ही. जी. सोनटक्के, एम. एस पारखे, गणेश गाडळकर, एस. के. इथापे, एस. आर. निंबाळकर आदींच्या त्यावर सह्य़ा आहेत.