घरात व शेजारच्या दुकानात लहान-मोठ्या चोऱ्या करतो म्हणून संशय घेऊन आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाचा खून केला आणि नंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मंगळवेढा येथे घडलेल्या या घटनेची वाच्यता होऊन अखेर पोलिसांनी संबंधिताला अटक केली आहे.

लक्ष्मण सुरेश विटकर (वय १३, रा. दुधनी, ता. अक्कलकोट) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा काका म्हणजे मावशीचा पती लखन विलास जाधव (वय ३५, रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) याला पोलिसांनी अटक केली आहे. गेले तीन महिने करोना तथा टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मृत लक्ष्मण हा दुधनी येथून मंगळवेढा येथे आजोळी राहात होता. परंतु घरात आणि शेजारच्या दुकानात लहान-मोठ्या चोऱ्या होत असल्यामुळे त्यात छोट्या लक्ष्मण यानेच या चोऱ्या केल्याचा संशय बळावला. तेव्हा रागाच्या भरात त्याला घरात मावशीचा पती लखन जाधव याने बेदम मारहाण केली. यात तो बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडला. हा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून लखन जाधव याने मृत लक्ष्मण याचा मृतदेह उचलून निर्जन ठिकाणी नेला व तेथे जमिनीत पुरून टाकला. त्यानंतर पुन्हा चलाखी करीत, लखन याने सासू म्हणजे मृत लक्ष्मण याची आजी भंगारेखा चंद्रकांत माळेकर हिला नातू लक्ष्मण हरविल्याची तक्रार मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यास प्रवृत्त केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी स्वतः दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मृत लक्ष्मण हा हरविल्याच्या तक्रारीची चौकशी करताना विसंगत माहिती मिळाल्याने पोलिसांना घरातीलच मंडळींवर संशय आला. यासंदर्भात सखोल चौकशी करताच हा खुनाचा प्रकार उजेडात आला. गुन्ह्याची कबुली देत, मृतदेह पुरलेली जागा लखन जाधव याने दाखविली. त्यानुसार पुरून टाकलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला. कुजलेल्या मृतदेहाची जागेवरच न्यायवैद्यक तपासणी करण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बामणे यांनी सांगितले.