शिक्षा भोगत असताना येरवडा कारागृहात झालेल्या वादाच्या कारणावरून जामिनावर सुटल्यानंतर वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत एकाचा खून करून त्याचा मृतदेह नीरा उजवा कॅनॉलमध्ये फेकल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. लोणंद पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

वैभव सुभाष जगताप (वय २८, रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत दि. ८ जून रोजी नीरा उजवा कॅनॉलमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती तो मृतदेह मंगेश सुरेश पोमन (वय ३५, रा.पोमन नगर, पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्याचा खून करून त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देऊन पुरावा नाहीसा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

धीरज पाटील या घटनेच्या अनुषंगाने म्हणाले, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि लोणंद गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करून त्यापैकी वैभव सुभाष जगताप याला पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी शिताफीने अटक केली. याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, मंगेश पोमन, वैभव जगताप आणि ऋषिकेश पायगुडे हे तिघे येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांच्यात वाद झाला होता. हे तिघेही जामिनावर सुटल्यानंतर मंगेश पोमण याचा दोघांनी खून केल्याची कबुली वैभव जगताप याने दिली आहे. दुसरा संशयित ऋषिकेश पायगुडे याला आज पोलिसांनी नाशिक येथे ताब्यात घेतले अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

या कारवाईत लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक फौजदार शौकत सिकीलकर, देवेंद्र पाडवी आदींनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.