|| प्रशांत देशमुख

जागतिक बाजारपेठेत एक टक्कादेखील हिस्सा नाही

अवघ्या दहा वर्षांपूर्वी योग्य दराअभावी विदर्भातच सडणाऱ्या नागपुरी संत्र्याची स्थिती आता बऱ्यापैकी सुधारली आहे. मनमानी दराने संपूर्ण संत्रीबागा विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांना सध्या शेतकरी म्हणेल त्या भावाने संत्री घ्यावी लागत असल्याचे चित्र कारंजा मोर्शी भागात आहे. संत्र्यांची परिस्थिती सुधारली असली तरी जागतिक बाजारपेठेत भारतीय संत्र्याचा हिस्सा एक टक्काही नसल्याचे सांगितले जाते.

जी.आय. मानांकन मिळालेली नागपुरी संत्री चवीत व रसाळपणात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. दुबईच्या राजघराण्यानेही पसंती दर्शवली. फ ळांच्या रसात जागतिक बाजारपेठेत संत्र्याचा रस सर्वाधिक खपतो, पण यात नागपुरी संत्री स्पर्धेत कुठेच नाही. वाणात अव्वल नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठेत टिकायचे असेल तर बरीच मजल गाठावी लागेल, असे  संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे नेते श्रीधर ठाकरे सांगतात.

पिढीजात उत्पादन घेणाऱ्या विदर्भातील संत्री उत्पादकांची प्रथम दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच घेतल्याचा दाखला दिला जातो. काही प्रमाणात पूर्वी निर्यात होत होती, पण केंद्र शासनाच्या निर्यातक्षम फळांच्या यादीत समावेश गडकरींच्याच पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी झाला. याविषयी सूत्रे हाताळणाऱ्या ‘अपेडा’या केंद्रीय संस्थेने संत्र्याला यादीत स्थान देत अधिकृत निर्यातीचा मार्ग खुला केला. व्यापारी वर्गाने बांगलादेश, श्रीलंकेत निर्यात सुरू केली. भाव स्थिरावले. २०१५ साली पाच रुपये किलोने विकली जाणारी संत्री आज २५ ते ३० रुपये किलोवर गेली.

गेल्या वर्षी दुबईला संत्री पाठवण्यात आली, पण टिकाऊपणाचे तंत्र माहीत नसल्याने ती वाटेतच सडली. या अनुभवानंतर कारंजा येथे ‘ग्रेडिंग व कोटिंग’चे तंत्रज्ञान आले. प्रतवारीनुसार संत्र्याला भाव मिळू लागला. तसेच कोटिंगमुळे टिकाऊपणा वाढला. पुढील समस्या वाहतुकीची आहे. रेफ र कंटेनर (फि रते शीतगृह) मुंबईहून आणावे लागतात. ते असल्यासच संत्र्याची वाहतूक ‘टिकाऊ’ ठरते. अन्यथा अन्य मार्गाने संत्री पाठवल्यास इच्छितस्थळी पोहोचेपर्यंत अर्धा माल खराब होतो. या कंटेनरच्या खर्चासाठी अनुदान देण्याबाबत पाठपुरावा सुरू झालेला आहे.

पंजाबच्या ‘किन्नो’ ला सवलती

पंजाबच्या ‘किन्नो’ या संत्र्याला अशा सर्व सवलती पूर्वीच मिळाल्या आहेत. कारंजा, मोर्शी, परतवाडा या ठिकाणी कोटिंगची यंत्रे आता आली आहे. पंजाबात असे ५६ प्रकल्प आहेत. चवीने नागपुरी संत्र्यापेक्षा मागे असूनही सवलतींमुळे पंजाबची संत्री बाजारपेठेत सर्वत्र पोहोचली. ग्रामीण भागात असणारी सोय नागपुरातच नाही. नागपूरच्या बाजारेपेठेत रोज एक हजार टन संत्र्याची आवक होते, पण कोटिंग यंत्रणा नसल्याने सरसकट उचल केली जाते. ही प्रक्रिया मग बिहार, उत्तर प्रदेशात होते. नागपूरला पडेल त्या भावानेच संत्री उत्पादकांकडून घेतली जातात. कारंजा मोर्शीच्या संत्री उत्पादकांचा ताळेबंद मात्र सुधारला. व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली. भाव वाढले, ते परत वाढू शकतात, पण त्यासाठी तंत्रज्ञानाची जोड आवश्यक ठरते. मध्यंतरी स्पेनच्या संत्री तज्ज्ञाने कारंजा मोर्शी या भागात पाहणी दौरा केला होता. त्याने निदर्शनास आणलेल्या उणिवा शेतकऱ्यांना थक्क करणाऱ्या ठरल्या. पाणी केव्हा व कसे द्यायचे, यापासून ते संत्र्याची व झाडाची तोड कशी करायची, इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केले. संत्रावर्गीय फ ळांवर संशोधन करणाऱ्या कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना यासाठी वेळच मिळाला नाही. जागतिक पातळीवर सध्या आपण मिरवू शकतो. मात्र, दादागिरी प्रस्थापित व्हायला अद्याप अवकाश आहे, असे संत्र्याबाबत म्हटले जाते. तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाल्याखेरीज वैश्विक व्यापार शक्य नसतो, हे वारंवार निदर्शनास आणले जाते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा भक्कम पाठिंबा नागपुरी संत्रीला आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मिळाली.

नागपुरी संत्री उत्पादकांना आजवर कृषी अधिकाऱ्यांचेच मार्गदर्शन लाभले, कृषी शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञाचे नाही. परिणामी, कागदोपत्री सल्ले वाचण्याखेरीज पर्याय नव्हता. महोत्सव व अन्य माध्यमातून संत्री उत्पादनास बळ देण्याचा प्रयत्न आहे. नव्या सोयींसाठी शासन मदत करू शकेल. संत्री वाहतुकीबाबत केंद्र व राज्य शासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.बांगला देशात निर्यात करताना शंभर टक्के निर्यात कर लावला जातो. त्यात सवलत मिळावी म्हणून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र दिले आहे.   – श्रीधर ठाकरे, संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे नेते