|| एजाजहुसेन मुज़ावर

अखेरचे एकमेव चित्रपटगृह बंद पडल्याने करमाळ्यातील रसिकांमध्ये रुखरुख

मराठी चित्रपटसृष्टीचे नाव जगभर नेणारे नागराज मंजुळे यांची निर्मिती आणि भूमिका असलेला ‘नाळ’ राज्यात सर्वत्र दिमाखात झळकला असला तरी गावात एकही चित्रपटगृह न उरल्याने खुद्द मंजुळेंच्याच करमाळा भागाची चित्रपटसृष्टीशी असलेली ‘नाळ’च तुटली आहे.

‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ सारखे गाजलेले चित्रपट आणि ‘पिस्तुल्या’, ‘पावसाचा आनंद’ या लघुपट निर्मितीमुळे नागराज मंजुळे हे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. विशेष म्हणजे चित्रपट सृष्टीची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या एका लहानशा गावातील चित्रपटगृहांनीच मंजुळे यांच्यातला ‘प्रेक्षक’ प्रथम घडवला आणि मग आपल्या मनाला भिडणारे सामाजिक वास्तव रूपेरी पडद्यावरही दिसले पाहिजे, या भावनेतून त्यांच्यातील सर्जनशील दिग्दर्शकालाही जन्म दिला. त्याच गावातील चित्रपटगृहे बंद पडल्याने करमाळ्यातील चित्रपट रसिकांना रुखरुख लागली आहे.

मंजुळे हे करमाळा तालुक्यातील जेऊरचे राहणारे. लहानपणापासून त्यांना चित्रपटांचे वेड होते. करमाळ्यातील ‘सागर’ आणि ‘योगेश’ या चित्रपटगृहांत त्यांनी अनेक चित्रपट पाहात स्वत:च्या कलाजाणिवांची जोपासना केली. त्यामुळे या दोन्ही चित्रपटगृहाशी करमाळ्यातील रसिकांच्याही भावना जोडलेल्या आहेत.

काळाच्या ओघात प्रथम ‘योगेश’ चित्रपटगृह बंद पडले. त्यानंतर एकमेव ‘सागर’ चित्रपटगृहात ‘सैराट’ आणि ‘फॅन्ड्री’ हे मंजुळे यांचे चित्रपट पाहताना ‘आपल्या गाववाल्याचा सिनेमा’ म्हणून नागराज मंजुळे यांच्याविषयी तेथील रसिकांनी अभिमान बाळगला. हे दोन्ही चित्रपट ‘सागर’मध्ये शेवटपर्यंत हाऊसफुल्ल चालत होते. स्वत: मंजुळे यांचे ‘सागर’ चित्रपटगृहाशी ॠणानुबंध होते. मात्र आता हे एकमेव चित्रपटगृहही बंद झाल्याने मंजुळे यांचा ‘नाळ’ गावात इच्छा असूनही पाहता येत नसल्याची हुरहूर करमाळ्यातील प्रेक्षकांना सतावत आहे. मंजुळेंशी असलेली ही भावनिक ‘नाळ’ जोडण्यासाठी करमाळावासियांना आता अन्य दूरवरच्या शहरांतील चित्रपटगृहांचा पर्याय शोधावा लागत आहे.

मंजुळे यांनी स्वत:च्या निर्मितीसह अभिनय केलेला ‘नाळ’ चित्रपट राज्यातील शेकडो चित्रपटगृहांतून प्रदर्शित झाला आहे. परंतु त्यांच्या स्वत:च्या गावी त्यांच्या बालपणीच्या सवंगडय़ांसह समस्त गावकऱ्यांना आता ‘नाळ’ पाहता येत नसल्याचे दु:खं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता दुसऱ्या शहरांशिवाय पर्याय राहिलेला नाही.