नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजापूर येथे म्हटलं आहे. तर नाणार प्रकल्प कोकणात आणण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही मित्रपक्षात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कलगीतुरा रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. नाणारमधील बड्या गुंतवणुकदारांसाठीच मुख्यमंत्र्यांचा सर्व खटाटोप सुरू आहे. नाणार होणार की जाणार यात सत्ताधाऱ्यांमध्येच ओढाताण सुरू असताना कोकणवासीयांच्या मताला काही किंमतच उरलेली नाही. साहेब हे भूमाफियांच्या फायद्याचा विचार करत आहेत तर, उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या प्रतिष्ठेचा विचार करत असल्याचे  धनंजय मुंडेंनी  म्हटलं आहे.

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाणारमधील जमिनीत बड्या गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवली आहे. त्यांचं भलं व्हावं यासाठी मुख्यमंत्री महोदयांचा खटाटोप सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना मी आव्हान करतो की, त्यांनी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्या भूमाफियांची नावे आठ दिवसात जाहीर करा. अन्यथा मी तुमचं पितळ उघडं पडतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल कोकणात होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत फेरविचार करु असं म्हटलं होतं. नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करतो आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले होते.