सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने विष पिऊन अत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्हातील जुना लोहा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणातील हृदयदावक गोष्ट म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी बारावीला असून तिच्यावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, तरीही खचून न जाता हुंदके देत ती भवितव्याचा विचार करुन परीक्षेला सामोरी गेली.

जुना लोहा येथील माजी नगरसेवक रमेश माधवराव शेटे (वय ४२) यांच्या कुटुंबाकडे दोन एकर जमीन होती. राजकारण सोडून त्यांनी शेतीमधे लक्ष दिले होते. परंतू, गेल्या तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात फारसे उत्पादन निघत नव्हते. दुसरीकडे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच गेला. हे कर्ज कसे फेडावे आणि संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत रमेश शेटे वैफल्यग्रस्त झाले होते.

दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शेतात झोपण्यासाठी जातो असे सांगून ते रात्री घरातून शेताला गेले. सकाळी १० वाजले तरी ते घरी आले नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता शेतातील आखाडयावर त्यांचा मृतदेह आढळून आला. रमेश शेटे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर बँकेचे व खाजगी कर्ज होते, अशी माहीती नातेवाईकांनी दिली.

बुधवारी शेटे यांच्या मुलीचा पहिला पेपर होता. त्यासाठी ती परभणी येथे परीक्षा देण्यासाठी जाणार होती. बुधवारी सकाळी तयारी करुन ती परीक्षा देण्यासाठी जाण्याच्या तयारीत असतानाच वडिलांच्या आत्महत्येची बातमी तिला समजली. मात्र, तरीही खचून न जाता जड अंतकरणाने तीने बारावीची परिक्षा दिली.