शुक्रवारी रात्री सराफा बाजारातील गुरूकृपा ज्वेलर्सचे मालक रविंद्र चक्रवार यांचा कैचीने हल्‍ला करून खून करण्यात आला होता. हा खून भागीदारीच्या व्यावसायीक वादातून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर चक्रवार शनिवारी सायंकाळी मयत चक्रवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घरफोडी, चोरी, गोळीबारासारख्या घटनांनी नांदेड शहर सध्या चर्चेत आले आहे. शुक्रवारी रात्री सराफा बाजारात सराफाचा खून करून दुकानातील सोने, चांदी लूटून नेल्याची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत तपासाची चक्रे फिरवली. सुरूवातीला हा चोरीचा प्रकार असावा, असे वाटत असताना नंतर मात्र प्रकरणाने वेगळे वळण घेतले. तपास करताना हा प्रकार भागीदारी व्यावसायातून झाला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मयत रविंद्र चक्रवार, नांदेडचा एक व्यापारी व उमरीचे दोन व्यापारी अशा चौघांची घाऊक सोने विक्री व प्लॉटींगचा व्यवसाय आहे. याच व्यवसायाच्या वादातून भागीदाराने चक्रवार यांचा सोने कापण्याच्या कैचीने त्यांच्याच दुकानात खून केल्याचे निष्पन्न झाले.  शेजारील दुकानाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये हा आरोपी तोंडाला रूमाल बांधून जात असल्याचे दिसत आहे. मयत व आरोपी हे दोघेही नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले. आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसून पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी पथक पाठविले असल्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी सांगितले.