बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मनाची श्रीमंत ठेवा, पण उद्धव ठाकरे कुजक्या मनाचे असून टीकेशिवाय त्यांना काही दिसत नाही अशा तिखट शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेचा समाचार घेतला. पूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटायला शिवसैनिक मोठ्या संख्येने यायचे. आता उद्धव ठाकरेंचे कुजके, नासके आणि दुष्टबुद्धीचे विचार ऐकायला मिळतात. शिवसेनेचा दसरा मेळावा हा चेष्टेचा विषय झाल्याची टीका त्यांनी केली.

नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत नवीन राजकीय पक्षाची घोषणा करतानाच शिवसेनेवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असून कंत्राटासाठी टक्केवारी द्यावी लागते. भ्रष्टाचारामुळेच मुंबईत मराठी माणसाला घर घेता येत नाही. महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असल्याने उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही असे राणेंनी सुनावले. शिवसेनेचे मुखपत्र सामना तोट्यात असून मग उद्धव ठाकरेंच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय?, शिवसेना हा स्वार्थी पक्ष असून महाराष्ट्रात तुम्ही सत्तेसाठी लाचार का आहात असे प्रश्न त्यांनी सेनेला विचारले आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची चिमटाही त्यांनी काढला.

शिवसेना सत्तेत आहे, नोटाबंदीसारख्या निर्णयाला शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध दर्शवला पाहिजे होता. सत्तेवर असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगले पर्याय द्यावे लागतात, रस्त्यावर उतरुन पर्याय देता येत नाही असा टोला त्यांनी सेनेला लगावला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी केंद्रात बौद्धिक आणि वैचारिक काम केले नाही. महाराष्ट्र आणि केंद्रात उद्धव ठाकरेंचे योगदान काय असा सवालही त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंना भारताची घटना आणि लोकशाहीचा किती अभ्यास आहे हे मला माहित नाही. पण उद्धव ठाकरेंना सत्ता कळली नाही असे राणे म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी रावणाची भूमिका वठवली अशी बोचरी टीका त्यांनी केली. मोठ्या पदावरील व्यक्तीवर टीका केल्यावर आपणही मोठे होतो असे काहींना वाटते. पण पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करताना आपण मर्यादांचे पालन केले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त प्रसारमाध्यमांनी जिवंत ठेवले. त्यांचे काम काय आहे ? असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.