महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते आमचेच खासदार आहेत. भाजपाच्या कोटयातून ते खासदार झाले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या प्रश्नावर म्हणाले. ते इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये बोलत होते.

नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार असे म्हणत असले तर तो निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन घेण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राची वाट लावली असे तुम्ही म्हणता.

पण दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाच्या नेत्यांना तुम्ही भाजपामध्ये घेत आहात या प्रश्नावर फडणवीस यांनी ज्यांनी वाट लावली, ज्यांच्यावर आरोप आहेत अशा नेत्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतलेले नाही असे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचा बचावही केला. त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

शरद पवारांचं युग संपलं

शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. लोकांना तोडया-फोडण्याचं राजकारण आता आवडत नाही. नवी पिढी आमच्यासोबत का आहे? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये बोलताना म्हणाले.

तुम्ही साखर सम्राटांना भाजपामध्ये येण्यासाठी नोटीसचे भय दाखवता असा आरोप शरद पवार करतात. त्यावर फडणवीस यांनी शरद पवार असे राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना तसे वाटते. शरद पवारांनी राजकारण करताना पक्ष बनवले, फोडले आता तेच त्यांच्यासोबत होत आहे तर ओरड कशाला करता?