माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लांबतच राहिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आदेश धुडकावून आपल्या नेतृत्वाखाली कोकणात समांतर काँग्रेस निर्माण करण्याची खेळी राणे यांच्याकडून खेळली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारण्या प्रदेश काँग्रेसने बरखास्त केल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात झटपट कार्यवाही करत राणेंच्या विश्वासातील दत्ता सावंत यांच्या जागी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विकास सावंत यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या सोमवारी राणे यांनी कुडाळमध्ये समर्थकांचा मेळावा आयोजित करत काँग्रेसच्या नेतृत्वावार टीकास्र सोडले. त्यापाठोपाठ उद्या, गुरूवारी कणकवलीजवळ ओसरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित केलेली असून पक्षाच्या जिल्हा पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. आपल्या भावी वाटचालीबाबतची घोषणा या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन राणे करणार आहेत. त्याचबरोबर भाजपा प्रवेशाची वाट न बघता पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी समर्थ विकास पॅनेलच्या बॅनरखाली उमेदवार उभे करण्याचाही निर्णय त्यांनी गेल्या सोमवारीच जाहीर केला आहे.
दुसरीकडे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व माजी खासदार नीलेश राणे यांनी बुधवारी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना आम्ही मानतच नाही, फक्त पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचाच आदेश मान्य करू, असे सांगत राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकारिणी यापुढे कार्यरत राहतील, असे जाहीर केलेआहे.
या घडामोडी लक्षात घेता, प्रदेश काँग्रेसचे आदेश धाब्यावर बसवत राणेंच्या समर्थकांचा भरणा असलेल्या काँग्रेसच्या माध्यमातून कोकणात समांतरपणे संघटना चालवण्याची खेळी स्पष्ट होत आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत राणे ‘सीमोल्लंघन’ करणार का, याबाबत सर्वत्र उत्सुकता असली तरी सध्याचे राजकीय वातावरण पाहता, तशी शक्यता अंधुक आहे. मात्र काँग्रेस व भाजपाने मिळून केलेली कोंडी फोडण्यासाठी कोकणात काँग्रेस पक्षांतर्गत शक्तीप्रदर्शन करण्याचा राणे यांचा प्रयत्न राहील आणि त्यामध्ये ते यशस्वीही होतील, असे चित्र आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 1:29 am