डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. बेरोजगारांना अटक करता, पण पुरावे कुठे आहेत, असा सवाल विचारतानाच दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे, अशा शब्दात हायकोर्टाने सीबीआयला खडेबोल सुनावले आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार हायकोर्टाने सीबीआयला खडे बोल सुनावले आहेत. हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, याकडे लक्ष वेधत हायकोर्टाने सांगितले की, तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का?, बेरोजगारांना अटक करता पण पुरावे कुठे आहेत?, असे हायकोर्टाने विचारले. गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काही आरोपींना अटक केली आणि यानंतर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीही जाळ्यात अडकले होते.

हायकोर्टाने कर्नाटक पोलिसांच्या तपासाकडे लक्ष वेधताना दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे, असे सीबीआयला सुनावले आहे. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.