News Flash

दोन उद्योगपती सोडले, तर सारे काही उद्ध्वस्त

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, काँग्रेसची अमरावतीत निदर्शने

अमरावतीत निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, काँग्रेसची अमरावतीत निदर्शने

अमरावती : गेल्या सात वर्षांत नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या लाटेत ‘नमस्ते ट्रम्प’च्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलिगीच्या नावावर करोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला तर दुसऱ्या लाटेतही करोनाचे रुग्ण व मृत्यू वाढत असताना मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने १३० कोटी जनतेला करोनाच्या खाईत लोटले. दोन उद्योगपती सोडले, तर सारे काही उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी के ला आहे.

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काराभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने रविवारी अमरावतीत काळ्या फिती लावून निदर्शने केली तसेच मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार सुलभा खोडके , आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मोदी सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. करोना महामारीत तर मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणा केला. लाखो लोक प्राणवायू, औषधांअभावी मरण पावले. जानेवारी २०२१ मध्येच लसीचे नियोजन केले असते तर आज लसीसाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या नसत्या पण १३० कोटी जनतेचा विचार करून त्या प्रमाणात लसींची मागणीच केली नाही.

सहा महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहते, पण मोदींना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेला देशोधडीला लावले. स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत ७० वर्षांत देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी अपार मेहनत घेऊन देश उभा केला पण मोदींना आपल्या मूठभर  उद्योगपती मित्रांसाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बँका हे सर्व विकायला काढली. देश अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या मोदी सरकारचा काँग्रेसने आज काळा दिवस पाळून निषेध केला, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मोदींच्या कार्यकाळात देश काळोखात -तिवारी

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. करोना साथरोग नियोजनात अपयश आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाची दररोज भाववाढ होत आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे अपयशी निर्णय घेतले. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरीविरोधात काळे कायदे करण्यात आले. मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मागील सात वर्षांत देशात काळोखच पसरला असल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात रविवारी कस्तुरबा चौकात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रितेश (रामू) तिवारी बोलत होते.

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढिया, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड. मलक शाकिर, उमाकांत धांडे, यांनी मनोगतातून केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी काळ्या रंगाचा मुखवटा असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यावर केंद्र सरकारच्या अपयशाच्या विषयांचे फलक लावण्यात आले होते. प्रास्ताविक गोपाल अमृतकर यांनी, तर आभार एनएसयूआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी मानले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 3:47 am

Web Title: narendra modi s government failed at all levels vijay wadettiwar zws 70
Next Stories
1 Maharashtra Lockdown Relaxations : निर्बंध अंशत: शिथिल
2 मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर
3 “पेट्रोल दरवाढीवर आंदोलनं करणारे भाजपा नेते आता कुठे लपले?”
Just Now!
X