तिहेरी तलाकचा अध्यादेश काही दिवसांनी रद्द होणार आहे, आमचे सरकार आल्यास या अध्यादेशाचा मसुदा रद्द करू व मुस्लिम समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन नवीन मसुदा तयार करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. भाजपाने अल्पसंख्याकांशी चर्चा न करता तिहेरी तलाकचा अध्यादेश आणला, मात्र राज्यसभेत याचे कायद्याचे रुपांतर होऊ शकले नाही असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान आज पालघरमध्ये राष्ट्रवादीच्या उज्वला काळे या जनतेतून थेट बहुमताने निवडुन आल्या. राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाल्याने पालघरमध्ये परिवर्तन झाले आहे. देशात आणि राज्यात देखील असेच परिवर्तन आता घडणार असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तीन भाषेतील जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केला. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ असं आश्वासन देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरनाम्यात शेतकरी, युवा, महिला हा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं आहे. आघाडी सरकारच्या काळात जे कार्य करण्यात आले त्यासंदर्भाचा समावेश या जाहिरनाम्यात करण्यात आला आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राफेल खरेदी व्यवहाराने देशाच्या विवेकबुद्धीला हादरे दिले आहेत अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आली असून यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानसोबत चर्चा कऱण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. एकीकडे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा केली जाऊ नये अशी मागणी होत असताना राष्ट्रवादीने मात्र पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा चर्चेला वाट मोकळी करुन देऊ असं आश्वासन दिलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीचे महासचिव डी पी त्रिपाठी यांनी सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी चर्चा करणं गरजेचं असल्याचं म्हटलं.

चीनसंबंधी आपली भूमिकाही राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. ‘चीनसाठी आम्ही चर्चेचे सर्व मार्ग खुले ठेवू. मात्र त्यांनी भारतीय औषधे, कृषी उत्पादने आणि आयटी सेवांसाठी आपली बाजारपेठ खुली करावी अशी आमची मागणी असेल’, असं राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात लिहिलं आहे.