शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उस्मानाबाद जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवले. शेतकरी प्रश्नावर मंत्र्यांना जिल्हाबंदी केल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जाहीर केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या हद्दीजवळील मुरुड गावाजवळ आंदोलन केले.

भल्यापहाटे ५ वाजता कडाक्याच्या थंडीत उस्मानाबाद जिल्ह्यच्या हद्दीवरील मुरुड गावाजवळ मोठय़ा संख्येने शेतकरी, कार्यकत्रे घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील महसूलमंत्री पाटील यांना रोखण्यासाठी सज्ज झाले होते. राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनाने महसूलमंत्री पाटील यांचा दौरा कार्यक्रम दोनवेळा बदलला. सुरुवातीला मुरुड, नंतर औसा, पाडोळीमाग्रे येणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात सकाळी सातच्या सुमारास ते तुळजापूरमाग्रे आले. रस्त्यावरील खड्डय़ांबाबत आंदोलन असल्याची माहिती प्रशासनाने महसूलमंत्र्यांना दिली होती. परंतु राष्ट्रवादीने आंदोलन यशस्वी करण्यासाठी केलेली तयारी पाहता महसूल मंत्र्यांनी पहाटेच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. या वेळी आमदार पाटील यांनी आंदोलनाचे विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर महसूलमंत्र्यांनी या सर्व बाबी अतिशय संवेदनशील असून मला सर्वच विषय महत्त्वाचे वाटत असल्याचे सांगत उस्मानाबादला आल्यावर नियोजित बठकीपूर्वी आपण चर्चा करून मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महसूलमंत्र्यांची जिल्हाबंदी करण्याऐवजी काळे झेंडे दाखवण्याचे आंदोलन केले.

मंत्र्यांच्या गाडीतून आमदार पाटील सोलापूरला रवाना

जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महसूलमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बठक घेऊन निर्णय घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे आंदोलनाची धार सौम्य झाली. चर्चा आणि महसूलमंत्र्यांच्या नियोजित बठकीनंतर आमदार पाटील आणि महसूलमंत्री एकाच गाडीतून सोलापूरकडे रवाना झाले.

सरकार व्यापारी नाही

गेल्या तीन वर्षांत शेतीमालाचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. एवढा शेतीमाल खरेदी करण्यासाठी सरकार काही व्यापारी नाही. मात्र, चांगला भाव मिळावा, यासाठी मोठय़ा कंपन्यांना खरेदीसाठी आमंत्रित करून त्यांच्यामार्फत चांगला भाव मिळवून देण्याचे नवे तंत्र लवकरच अवलंबिण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच १५ डिसेंबरपूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांच्या बठकीत दिले.