जिल्हा नियोजन समिती बैठकीला २ तास उशिराने येऊनही पालकमंत्री पंकजा मुंडे सभागृहात न येता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे कळताच वाट पाहत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार, पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत बैठकीवर बहिष्कार टाकला, तर प्रशासकीय यंत्रणेने पत्रकारांना अवमानकारक वागणूक दिल्याने पत्रकारही मंत्र्यांच्या पत्रकार बैठकीवर बहिष्कार टाकून निघून गेले.
जिल्हा नियोजन समितीच्या वार्षकि आराखडा मंजुरीसाठी पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात शुक्रवारी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन केले होते.
दोन तासांनंतर मंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. मात्र, त्यांनी सभागृहात न येता बैठक कक्षात भाजप आमदार पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली. याची माहिती कळताच संतप्त झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांनी पालकमंत्र्यांना वेळेचे भान नाही, दुष्काळाचे गांभीर्य नाही, असा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन बैठकीवरच बहिष्कार टाकला . पालकमंत्री झाल्यानंतर मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या  वार्षकि आराखडा मंजुरीसाठीची पहिली बैठक होत असल्याने कार्यकत्रे मोठय़ा संख्येने आले होते. मात्र, पोलिसांनी जिल्हाधिकारी परिसरात बंदोबस्ताचा अतिरेक केला. पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक उशीर केला असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.