नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जागेवर हक्क तर सांगितलाच, पण काँग्रेसचे नेत्यांच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना पुन्हा राजकीय धक्का दिला. एवढेच नव्हे तर विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आल्याने दोन्ही काँग्रेसमधील जागावाटपावरून तणातणी होईल हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला नगर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात गेलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा विधानसभेत पराभव घडवून आणून राष्ट्रवादीने राहुल जगताप यांना आमदार केले. त्याकरिता राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, स्वर्गीय कुंडलिक जगताप, बाळासाहेब नहाटा, अण्णासाहेब शेलार आदी सर्व नेत्यांना एकत्र केले होते. अद्याप अजित पवारांच्या मनातील राग दूर न झाल्याने पाचपुते यांना शह देण्यासाठी हल्लाबोलचा तिसरा टप्पा श्रीगोंद्यातून सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे अद्याप दोन काँग्रेसमधील जागावाटप झालेले नसताना पुन्हा जगताप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अकोल्यातून आमदार वैभव पिचड यांची उमेदवारी जाहीर तर केलीच, पण कोपरगावमधून माजी मंत्री शंकरराव काळे यांचे नातू व माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष काळे, शेवगाव-पाथर्डीतून माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुरी नगर मतदारसंघातून माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीचेही जाहीर संकेत दिले. निवडणुकीला वेळ असला तरी त्यांना आतापासूनच तयारी करण्यास सांगण्यात आले.

दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटप झाले नसले तरी नगर जिल्ह्यात मात्र लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारांचे वाटप झाले आहे. अशा आविर्भावात नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिणेची जागा ही पूर्वी राष्ट्रवादीकडे होती. पण जागावाटपात बदल करून ती काँग्रेसला मिळेल. एवढेच नव्हे तर काँग्रेसची उमेदवारी डॉ.सुजय विखे यांना मिळेल, असे गृहीत धरून त्यांनी गेल्या एक वर्षांपासून तयारीही सुरू केली आहे. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याशी  माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच अजित पवार यांच्यात राजकीय वैमनस्य आहे.  विखे यांनी मागील विधानसभा निवडणूक काळात पक्षाचे काही उमेदवार पाडल्याचा ठपका आहे. विखे व पवार हे नगरच्या राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यामुळे पुन्हा हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्यातील दरी अद्याप कमी झालेली नाही, हे स्पष्ट झाले. नगरची जागा बदलणार ही अफवा असल्याचे सांगून त्यांनी विखे यांना टोला लगावला. एवढेच नव्हे तर दक्षिणेची जागा सोडणार नाही, ती लढवणार, असे प्रत्येक सभेत सांगून विखेंना लक्ष्य केले. त्यामुळे आता डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारीचा मार्ग तर बिकट आहेच, पण दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात नगरच्या जागेचा मुद्दा हा वादग्रस्त ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे  शेवगाव-पाथर्डी, राहुरी-नगर, कोपरगाव, अकोले, श्रीगोंदा या जागा पूर्वीपासून आहेत. राजकीय बदलात राहुरी-नगरची जागा बदलण्याचा प्रस्ताव काँग्रेसने आणला. तर त्याला संमती दिली जाणार नाही, असा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला. विखे यांना नगरच्या राजकारणातच शह देऊन गुंतवून ठेवण्याची राष्ट्रवादीची खेळी हल्लाबोलच्या निमित्ताने पुढे आली.

हल्लाबोल आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना संधी दिली. राहुरीच्या सभेत तर अजित पवार यांच्यानंतर  शेवटी त्यांचे भाषण ठेवले. मी पक्षशिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. मला शेवटी बोलताना अवघडल्यासारखे होते. पण तुम्ही परवानगी दिली तो मनाचा मोठेपणा आहे. तुमच्या आदेशामुळे मी बोलतो, असे सांगून मुंडे यांनी जोरदार भाषण केले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, स्वर्गीय आर.आर.पाटील यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी आता मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीने टाकली आहे. महिलांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे, राज्याच्या आíथक परिस्थिती व कर्जमाफीवर जयंत पाटील, पक्षाचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामावर तटकरे हे बोलले. पवार यांनी स्थानिक राजकारणाचे संदर्भ, विविध प्रश्नासंदर्भात पूर्वीच्या सरकारने केलेली कामगिरी व आताच्या सरकारचे काम यावर त्यांनी भूमिका मांडल्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  टीका टाळली. मात्र हे काम मुंडे यांच्यावर सोपविण्यात आले होते. आगामी निवडणुकीतही हेच स्टार प्रचारक राहतील, हे स्पष्ट झाले आहे. हल्लाबोल ही त्याची रंगीत तालीम ठरली आहे.

आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी

गुजरातच्या निवडणुकीत जातीच्या आरक्षणाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाला भोवला. त्यामुळे राष्ट्रवादीनेही तो निवडणुकीत आणला आहे. मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत या आरक्षणाच्या मुद्दय़ावर सर्वच नेते टीका करताना दिसले. त्यामुळे निवडणुकीत हा मुख्य विषयपत्रिकेवर असेल हे सांगायला कुणाचीही गरज नाही.

शेतमालाचे पडलेले भाव, कर्जमाफी, बोंडअळी व गारपिटीची भरपाई, ऑनलाइनमुळे होणारा त्रास, नोकऱ्यांचा अभाव, बँकांतील घोटाळे, शेतकरी आत्महत्या हे नेहमीचे मुद्दे हल्लाबोलच्या अग्रस्थानी होते. टीका करताना सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनाच लक्ष्य करण्यात आले असले तरी अन्य मंत्र्यांना मात्र वगळण्यात आले आहे.