राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भीमा कोरेगाव दंगलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावे तसेच भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्याआधी त्यांनी ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.

धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.