दिल्लीमध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे माहित नाही. पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची पत जनतेच्या मनातून उतरली आहे, असा चिमटा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना काढला आहे. नाणारवरुन शिवसेना आणि भाजपा कोकणवासीयांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना- भाजपामधील संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शिवसेना व भाजपावर टीका केली. नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांची फसवणूक सुरू आहे. नाणार भूसंपादनासंदर्भात १८ मे २०१७ ची अधिसूचना रद्द करण्याची सुभाष देसाई यांची घोषणा म्हणजे फार्स आहे. अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ? ही कारवाई झाली आहे का?, नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबत सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का ?, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय झाला आहे का ? हा प्रकल्प नाणार मध्ये येणार हे माहीत असतांना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले ?, असे सवालच त्यांनी विचारले आहेत.

दिल्लीमध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे माहित नाही. पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची जनतेच्या मनातून पत मात्र उतरली आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच कोकणवासीयांच्या सोबत आहे. नाणारबाबत जनभावना लक्षात घेवूनच निर्णय झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.