राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विखारी शब्दांत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात आलेत, हे तुम्ही विसरलात का, असा सवाल करत शरद पवारांविषयी बोलण्याची तुमची लायकी नसल्याची टीका त्यांनी केली. केंद्र व राज्य सरकारविरोधात काढण्यात येत असलेली हल्लाबोल यात्रा सोलापूर येथे आल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.

मुंबईत शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेलाच मुंडे यांनी उत्तर दिले. शरद पवारांविषयी बोलताना फडणवीसांनी मर्यादा बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दिल्लीतून रिंगमास्टर (अमित शाह) आल्याने त्यांना खूश करण्यासाठी फडणवीसांना केवळ जनावरे दिसत होती, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील मेळाव्यात मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असल्यासारखेच बोलत होते. यांना माहिती आहे राज्यात भाजपाची सत्ता जाऊन राष्ट्रवादीची सत्ता येणार. सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्याप्रमाणे बोलण्यापेक्षा आताच बोलेले बरे असे त्यांना वाटले असावे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या १६ भ्रष्ट मंत्र्यांसाठी तुरूंगात जागा पाहून ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. तत्पूर्वी, मोहोळ येथे झालेल्या सभेतही त्यांनी आक्रमकपणा दाखवत सरकारला झोडपून काढले. सरकारने लोकसभा निवडणुकांच्यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. पण प्रत्येक वर्षी नवा आघात जनतेवर केला. नोटाबंदीने गरीब जनतेचे कंबरडे मोडले. या सरकारला शेतकऱ्यांची जात नष्ट करायची आहे. म्हणून शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.