शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या वक्तव्यांना किती महत्त्व द्यावं हे आपण ठरवलं पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावणं हे योग्य नाही. कलाकारानं कायम सामाजिक भान, बांधिलकी जपली पाहिजे. ज्या समाजामुळे आपण मोठे होतो त्याबद्दल कृतज्ञही राहिलं पाहिजे. पण अकारण वक्तव्य होत असतील तर त्याला अवास्तव महत्त्व देण्यात येऊ नये या मताचे आपण असल्याचं कोल्हे म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी या विषयावर भाष्य केलं.

“आज मुंबई महाराष्ट्र सुरक्षित आहे ते केवळ पोलिसांमुळेच. जेव्हा रस्त्यावर पाणी तुंबतं तेव्हा कंगना रणौत ही रस्त्यावर उतरत नाही. तेव्हा पोलीस रस्त्यावर उतरले. जेव्हा करोनासारखं संकट आलं तेव्हा पोलीस समोर होते. अनेक पोलीस बांधवांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यावेळी कंगना समोर नव्हती,” असंही कोल्हे म्हणाले.

कंगनाच्या वक्तव्यांपेक्षा जास्त आव्हानं राज्यासमोर आणि देशासमोर आहेत. बेरोजगारी, जीडीपीमधली घसरण या सर्व गोष्टी संपल्या आहेत का? जगातील सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या आपल्या देशात येत आहे. आरोग्य व्यवस्था म्हणून आपण कमी पडतो आहोत का? दिवसाला लाखाच्या जवळ रुग्ण सापडत आहेत. या गोष्टी कंगनापेक्षा फार महत्त्वाच्या आहेत. ती काय बोलली यानं फार काही फरक पडत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. “कंगनाच्या वक्तव्यांमागे कोणीही बोलविता धनी असेल तरी हे शब्दांचे खेळ सर्वांना कळतात. महाराष्ट्रातील जनता तेवढी सुज्ञ आहे. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे त्यांनाही समजतं,” असंही कोल्हे म्हणाले.