आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं शिवसेनेनं शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमनं उधळली आहेत. 80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८० असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या ८० वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांची स्तुती केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

पवार हे ८० वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत. पवार स्वतःच ‘सह्याद्री’ बनून देशाचे नेते झाले आहेत. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ पवार संसदीय राजकारणात आहेत. ते सर्वच निवडणुकांत अजिंक्य आहेत. पवारांना जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. अर्थात हे आशीर्वाद ज्यांच्या बाबतीत सफल झाले अशा मोजक्या भाग्यशाली माणसांत शरद पवार आहेत.

आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे. यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्या छंदास कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे.

राजीव गांधींच्या हत्येने गांधी परिवार राजकारणातून बाहेर पडलेला, काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, दुर्बल झालेला, संसदीय काँग्रेस पक्षात तेव्हा मतदान झाले असते तर पवार नेतेपदी बहुमताने निवडून आले असते, पण वानप्रस्थाश्रमात निघालेल्या नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला. दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली.

देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत. पवार ८० वर्षांचे होत आहेत त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत.