“शिवसेनेसोबत काही गोष्टीत वैचारिक मतभेद होते. पण सुसंवाद नव्हता असं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुसंवाद होता. शिवसेनेच्या आताच्या नेतृत्वापेक्षाही अधिक सुसंवाद होता,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

“आमच्यात भेटीगाठी, चर्चा, एकमेकांकडे जाणं या सर्व गोष्टी होत्या. बाळासाहेबांनी एखादी व्यक्ती, कुटुंबाच्या संबंधी, पक्षाच्या संबंधी वैयक्तिक सुसंवाद ठेवला किंवा वैयक्तिक ऋणानुबंध ठेवला तर त्यांनी कधी कशाची फिकीर बाळगली नाही. ते सर्वांना उघडपणे मदत करत होते. सुप्रिया सुळे यांच्यावेळेसही बाळासाहेबांनी त्यांना बिनविरोध निवडून दिलं होतं आणि हे केवळ तेच करू शकतात,” असं पवार यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा- बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाशी सुसंगत कधी वाटलीच नाही : शरद पवार

बाळासाहेब रोखठोक

“बाळासाहेब ठाकरे हे जितके रोखठोक होते तितकेच ते दिलदारही होते. राजकारणात ही अशी दिलदारी दुर्मिळ आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही या देशातील एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती होईल याची यत्किंचितही तमा न बाळगता पाठिंबा द्यायचे. म्हणजे आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा निर्णय करणारे नेतृत्व म्हणूनच ते इंदिरा गांधी यांच्यासोबत उभे होते. आम्हालाही धक्का बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?

“मी हेडमास्तरही नाही आणि रिमोटही नाही. हेडमास्तर शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार आणि प्रशासन हे रिमोटनं चालत नाही. ज्या ठिकाणी लोकशाही नाही तिथे रिमोट असते. पुतीन यांचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी लोकशाही वगैरे सर्व बाजूला केलं आहे. ती एकहाती सत्ता आहे. आपल्याकडे लोकशाही पद्धतीनं आलेलं सरकार आहे. त्यामुळे ते कधीही रिमोटनं चालू शकत नाही. मला ते मान्यही नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहेत,” असंही ते यावेळी म्हणाले.