अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील पावसाचे भाषण सोशल मीडियावर चर्चेत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचं भाषण सुरु असताना पाऊस सुरु झाला. मात्र जो बायडन यांनी भाषण न थांबवता ते सुरुच ठेवलं. या भाषणाची तुलना महाराष्ट्रातल्या थेट शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या भाषणाशी होते आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यात प्रचार सभा होती. सगळा माहोल त्यावेळी भाजपाच्या बाजूने होता. मात्र शरद पवार हे साताऱ्यात बोलायला उभे राहिले आणि पाऊस पडू लागला. ज्यानंतर महाराष्ट्रात काय घडलं ते अवघ्या राज्याला ठाऊक आहेच. महाराष्ट्रात वर्षानुवर्षे एकमेकांचे सख्खे मित्र असलेले भाजपा आणि शिवसेना वेगळे झाले. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. परिवर्तन होणार हा नारा राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रचाराच्या वेळी दिला होता. आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

दरम्यान फ्लोरिडा येथील जो बायडन यांनी केलेल्या पावसातल्या भाषणाची तुलना ही थेट साताऱ्यातल्या शरद पवारांच्या भाषणाशी केली जाते आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अमेरिकेतही परिवर्तन घडेल असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.