राज्यात एकीकडे करोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन तसंच रेमडेसिविरचा तुटवडा मोठी चिंतेची बाब ठरत आहे. यादरम्यान केंद्र सरकारने राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी जाहीर केली आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!; ‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली
रेमडेसिवीरच्या वापराने मृत्यूदर कमी होत नाही- डॉ राहुल पंडित

नवाब मलिक यांनी ट्विट करत राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यात मोठं संकट निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, “केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार आधीपासून मागणी करत असल्याप्रमाणे दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे”.

“आतापर्यंत आम्हाला दिवसाला ३६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत. .यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यात मोठं संकट निर्माण होऊ शकतं,” अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

“केंद्र सरकारने आम्हाला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देत महाराष्ट्राच्या नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात,” अशी मागणी त्यांनी पुढे केली आहे.