महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झाला होता तेव्हा राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत भाजपाच्याही संपर्कात होती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. अजित पवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची कल्पना होती, पण ते इतका टोकाचा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एनटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीसाठी काँग्रेस नेते जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. “अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला त्याच्या एक दिवस आधी २२ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेत्यांसोबत शाब्दिक चकमक झाली होती. अजित पवार या संभाषणानंतर प्रचंड नाराज होते. काँग्रेस अतिरिक्त मंत्रिपदांची मागणी करत होतं. मी त्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवारही बाहेर पडले होते. यावेळी त्यांनी सहकाऱ्यांना उद्या आपण एकत्र कसं काम करणार आहोत कळत नसल्याचं सांगितलं. त्याच रात्री त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आधीपासूनच एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. “भाजपा नेत्यांकडून चर्चा झाली पाहिजे असं सुचवलं जात होतं. आपण एकत्र काम करु शकत नसलो तरी चर्चा झाली पाहिजे. ही चर्चा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात होती,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

“पण अजित पवार इतका टोकाचा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा त्यांना शपथ घेताना पाहिलं तेव्हा आपल्याला धक्का बसला. अजित पवारांना आपला पाठिंबा होता हा आरोप चुकीचा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी यावेळी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं हा दावा फेटाळला नाही. त्यांनी सांगितलं की, “अजित पवार उपमुख्यमंत्री होतील की नाही याबाबत सांगू शकत नाही. इतर नेत्यांशी याबाबत चर्चा झाली पाहिजे. पण भाजपासोबत गेल्याने नाराज असले तरी पक्षातील अनेक नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे”.

“निकालानंतर आम्ही सरकार स्थापन करण्याचा अजिबात विचार केला नव्हता. आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती. पण आश्वासन पूर्ण न केल्याने शिवसेना पहिल्या दिवसापासून नाराज असल्याचं आम्ही पाहत होतो. संजय राऊत यांच्यासोबत आमची चर्चा झाली. यावेळी अने बाबतीत एकमत असल्याचं लक्षात आलं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.