रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? खासदार तरी आहे का ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही असा टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीने एनडीएमध्ये यावं असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासंबंधी विचारण्यात आलं असता शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवारांनी आठवलेंच्या एनडीएमध्ये येण्याचा प्रस्तावावर बोलताना सांगितलं की, “रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही”. शरद पवार यांनी यावेळी सुशांत प्रकरणावरुन टीका करताना सीबीआयने आतापर्यंत काय दिवे लावले आहेत हे मला अजून दिसलेलं नाही. भलतीकडे सगळं चाललं आहे असं म्हटलं.

आणखी वाचा- शरद पवारांनी NDA सोबत यावं, शिवसेनेसोबत राहण्यात काही फायदा नाही – रामदास आठवले

आठवलेंनी काय म्हटलं होतं
रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा महायुतीत येण्याचं आवाहन केलं. शिवसेनेनं भाजप- रिपाईसोबत यावं असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला. “शिवसेना जर सोबत आली नाही तर राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं,” असं ते म्हणाले. “शरद पवार एनडीएमध्ये आल्यास मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो,” असंही त्यांनी सांगितलं.