वाई: जनता भिजत असताना मी छत्री घेणार नाही, असे सांगत त्यांनी पावसात भिजतच भाषण सुरू केले. ऐशी वर्षाचा योध्दा धो धो पावसात भिजत भाषण करत होता. समोर जनता त्याच जोशात शरद पवारांचे भाषण ऐकत घोषणा देत होती. पवारांनी भाषण केले आणि जनतेकडून शब्द घेतला. राज्याचे राजकारण बदलवून टाकणाऱ्या साताऱ्यातील त्या ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती करत राष्ट्रवादी काँग्रेस या सभेला मोठ्या प्रमाणात उजाळा देत आहे. मागील वर्षी विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणुक एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा झाली. ही सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धो.. पाऊस असूनही यशस्वी केली. धो.. पावसात भिजत शरद पवार यांनी सातारकरांना साद घातली. मी मागील वेळी केलेली चूक यावेळी सातारच्या जनतेने दुरूस्त करावी, अशी विनंती केली. पवारांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचा उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा शहर आणि जिल्ह्यात समाज माध्यम व फ्लेक्‍सबाजीच्या माध्यमातून या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची दिग्गज मंडळी भाजपच्या वाटेवर गेली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील बालेकिल्ल्याला खिंडार पडले. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभा निवडणुक लढून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनीही विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.तर शिवेंद्रसिंहराजेंनीही पवारांची भेट घेत नाही नाही म्हणत भाजपा त प्रवेश केला.  केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही भाजपचेच सरकार पुन्हा येईल, सत्तेतील पक्षासोबत राहिल्यास मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल तसेच मंत्रीपदही मिळेल या आशेने सातारा जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश  केला. आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोण वाचविणार असा प्रश्‍न उपस्थित झाला होता.

अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढला. अजून मी म्हातारा झालेलो नाही, असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली. एकीकडे भाजपकडून नरेंद्र मोदींपासून अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून केवळ शरद पवार अशात प्रचारात होते. शरद पवार यांनी बीड, बारामतीची सभा करून साताऱ्याची सांगता सभा करायचे ठरविले होते. पण, त्यादिवशी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पाहता साताऱ्याची सभा होईल का नाही, याबाबत शंका होती.

पाटणच्या सभेला थोडा उशीरच झाला. तेथेच पाऊस सुरू झाला होता. साताऱ्याची सभेबाबत चिंता व्यक्त केली गेली.आधी चार दिवसांपूर्वी भाजपची विभागीय सभा झाली होती. त्यामुळे साताऱ्याची राष्ट्रवादीची सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते.
सभेला मोठ्यासंख्येने लोक जमले होते, पावसाचेही वातावरण झाले होते.जिल्हा परिषदेचे मैदान खचखचून भरले होते. तेथे उपस्थित तरूण, युवक व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.  यामध्ये सर्वाला कलाटणी देणारी ठरली ती साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धो पावसातील सांगता सभा. जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या या सभेकडे समस्त सातारकरांचे लक्ष लागले होते. या सभेपूर्वी साताऱ्यात मोदी, शहा यांच्या सभा झालेल्या होत्या. साताऱ्यातील सांगता सभेत धो पाऊस पडत असतानाही शरद पवार काय इशारा करणार हे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी भर पावसात सातारकर जिल्हा परिषदेच्या मैदानावर थांबून होते.समोर जनता त्याच जोशात शरद पवारांचे भाषण ऐकत घोषणा देत होती.

पवार यांनी मागील वेळी माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चुक या निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त करावी, असे आवाहन केले. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीतून साताऱ्याचे खासदार झाले.या सभेला आज (रविवारी १८ ऑक्टोबर) एक वर्षे पूर्ण होत आहे. या सभेच्या आठवणी प्रत्येक सातारकराच्या मनात आजही घर करून राहिलेल्या आहेत. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण साताऱ्यात समाज माध्यम व फ्लेक्‍स लावून आठवणींना उजाळा दिला आहे.