बाजीराव-मस्तानीचा खरा इतिहास कोणालाच माहिती नाही. उगाच भावनेचा मुद्दा करून या चित्रपटाला विरोध करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी नागपुरात सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झाला. पुण्यातील कोथरूड सिटी प्राईड चित्रपटागृहाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाविरोधात निदर्शने करीत त्याचे शो बंद पाडले. यामुळे सिटी प्राईड चित्रपटगृह व्यवस्थापनाने ‘बाजीराव-मस्तानी’चे शुक्रवारचे सर्व शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी विधीमंडळाबाहेर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बाजीराव-मस्तानीचा जो इतिहास आहे, तो तसा कोणालाच माहिती नाही. पूर्वीपासून प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने त्याबद्दल लिहून ठेवले आहे. त्यातून हा इतिहास पुढे आला आहे. त्यावरूनच आता लोक आपली मते तयार करताहेत. चित्रपटाबद्दल बोलायचे तर तो प्रदर्शित करायचा की नाही, त्याला कोणते प्रमाणपत्र द्यायचे, याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेते. आता या विषयावरून कोणीही भावनेचा मुद्दा करू नये, असे त्यांनी सांगितले.