राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यासोबत काम करण्याची ऑफर दिल्याचा खुलासा केला आहे. यावर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून हा पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण आपल्या वडिलांनी अत्यंत नम्रपणे नकार दिला असल्याचं सांगितलं. “मी त्या बैठकीत नव्हते. ही दोन मोठ्या नेत्यांमधील बैठक होती. जर त्यांनी ऑफर केली असेल तर हा पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा आहे. विचारसरणी वेगळी असली तरी महाराष्ट्रात वैयक्तिक संबंध जास्त महत्त्वाचे आहेत,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण आपण तो नाकारला असल्याचा खुलासा केला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण एकत्र काम करु असा प्रस्ताव ठेवला होता. पण मी त्यांना सांगितलं की, आपले वैयक्तिक संबध चांगले आहेत आणि ते तसेच राहतील. पण एकत्र काम करणं शक्य नाही,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्याला मोदी सरकारने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं. “पण त्यांनी मला सुप्रिया सुळेंना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रस्ताव दिला होता,” असा खुलासाही शरद पवार यांनी केला.

“शरद पवार फक्त माझे वडील नाहीत तर बॉसही आहेत, आणि बॉस हा नेहमी बरोबर असतो,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी भाजपाला समर्थन देत पुन्हा स्वगृही परतण्यासंबंधी विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, “अजित पवारांसंबंधी पक्ष निर्णय घेईल. ते आधी माझे मोठे बंधू आहेत. मला पाच मोठे भाऊ आहेत. आम्ही एकत्र कुटुंब आहोत,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

“जर माझा मुलगा चुकत असेल तर त्याचा कान ओढण्याचा, ओरडण्याचा मला हक्क आहे. पण अजितदादा मोठे आहेत, त्यांना माझा कान ओढण्याचा हक्क आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. अजितदादांना माफ करु शकणार का ? असं विचारलं असता सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, “जर कुटुंबाने एकमेकाला पाठिंबा दिला नाही तर कोण देणार ? ते एक वाईट स्वप्न होतं. जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा स्वप्न संपलेलं असतं”.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, “जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं तेव्हा कोणीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगलं वागत नव्हतं. प्रत्येकाला पक्ष संपेल असं वाटत होतं, पण आज ते मुख्यमंत्री आहोत”.