एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि इतक्या दिवसांपासून सुरु असलेल्या तर्क-वितर्कांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी जंयत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवार मात्र यावेळी अनुपस्थित होते. अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती, मात्र शरद पवारांनी भाषणादरम्यान फेटाळून लावली. मात्र अजित पवार अनुपस्थित असले तरी सुप्रिया सुळे यांनी मात्र खडसेंसोबत त्यांची भेट घडवून आणली.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे आणि अजित पवार यांची प्रत्यक्ष नाही मात्र व्हिडीओच्या माध्यमातून व्हर्चुअल भेट घडवून आणली. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना व्हिडीओ कॉल लावला आणि थेट नाथाभाऊंशी बोलणं करुन दिलं. अजित पवार प्रकृती ठीक नसल्याने सध्या घरातच क्वारंटाइन झाले असून तेथून सर्व शासकीय कामकाज करत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा- …पण, राज्य सरकार पडणार नाही – खडसे

दरम्यान अजित पवार यांनीही ट्विट करत अप्रत्यक्षपणे हा दावा खोडून काढला आहे. अजित पवार यांनी ट्विट करत एकनाथ खडसे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली असल्याचं म्हणाले आहेत. अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे”.

पुढे ते म्हणाले की, “खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो”.

शरद पवार काय म्हणाले –
एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच… मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेंटिलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही”.