12 July 2020

News Flash

कृष्णाकाठी ‘मगरमिठी’!

सांगली परिसरात मगर-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

आमणापूर येथे पहुडलेली मगर. छाया-संदीप नाझरे.

दिगंबर शिंदे

एरवी संथ वाहणारी कृष्णामाई आपल्या पोटातील पाण्याचा अंदाज देत नाही. मात्र याच नदीमध्ये सध्या मगरमिठी पडली असून मानवी हस्तक्षेपामुळे सरभर होत असलेल्या मगरींचा पाळीव प्राण्याबरोबरच मानवालाही धोका निर्माण झाला आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील सहजीवनाचा अध्याय आता संघर्षांच्या टप्प्यावर आला असून आतापर्यंत या संघर्षांमध्ये तीन मगरींसह नऊ जणांचे बळी गेले आहेत. कृष्णामाईला पडलेली मगरमिठी अधिकाधिक घट्ट होत असून यावर दीर्घकालीन उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या आठवडय़ामध्ये मिरजेजवळील कृष्णाघाट परिसरात मृत मगर आढळून आली. प्राथमिक माहितीवरून ही मगर नदीतील मृत मासे खाऊन मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले असले तरी तज्ज्ञांच्या मते तिला रक्तक्षयाचा आजार झाला असावा असा अंदाज असल्याचे मानद वन्यजीव रक्षक पापा ऊर्फ अजित पाटील यांनी सांगितले. याशिवाय, कसबे डिग्रज, पलूस येथेही मगरीचे मृतावशेष गेल्या दोन वर्षांत आढळून आले आहेत.

कृष्णा नदीचा सांगली जिल्ह्य़ात तांबवे या गावी प्रवेश होतो. तेथून म्हैसाळ धरणापर्यंतचा प्रवास सुमारे ८० किलोमीटरचा आहे. या प्रवासामध्ये असलेल्या गावांना धनगाव, आमणापूर, औदुंबर, भिलवडी, कसबे डिग्रज, तुंग, सांगली, हरिपूर आदी ठिकाणी मगरीचे दर्शन हे नित्याचे झाले आहे. अगदी मानवी वस्ती निकट असतानाही मगरीचा वावर गेल्या दोन वर्षांत वाढला आहे. सांगली शहरालगत असलेल्या गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या समर्थ घाटावरही मगरीचे सातत्याने दर्शन घडत आहे. पोहणाऱ्यांच्या घोळक्यात मगर शिरल्याने उडालेली तारांबळ सांगलीकरांनी अनुभवली आहेच.

या मगरीपासून नागरिकांनी सावध राहावे असे फलक वन विभागाने जागोजागी लावले आहेत. मगरीच्या वास्तव्याची  नदीकाठी असलेल्या लोकांना जाणीव करून देण्यासाठी या पट्टय़ात वन विभागाने १८ कर्मचारीही नियुक्त केले आहेत. या वन कर्मचाऱ्यांचा जागता पहारा असला तरी मगरींचा वावर ते थोपवू शकणार नाहीत हे वास्तव आहे. मगरींचा प्रजनन काळ हा प्रामुख्याने डिसेंबर ते जून या कालावधीत असतो, यामध्ये सुरक्षित जागेची निवड, जोडीदाराची निवड, अंडी घालणे आणि संगोपन हा साधारण कालावधी असतो. या कालावधीत मगरींची आक्रमकता अधिक असते. नेमक्या याच कालखंडात मगरींचे हल्ले होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. प्रजनन काळात मगरींच्या पिलांचा वावर नदीकाठी पाहण्यास मिळत आहे. मगर मुळात उभयचर प्राणी असल्याने तिचा जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी वावर असल्याचे दिसून येत आहे. केवळ कृष्णा नदीतच मगरींचे वास्तव्य आहे असे नाही, तर चांदोलीपासून येणाऱ्या वारणा नदीतही मगरी आहेत. मात्र नदीकाठी मगर आणि मानवी संघर्ष फारसा दिसत नाही. या मागील कारणांचा शोध घेतला तर नदीकाठी असलेली गाळ माती आणि वाळू उपसा ही महत्त्वाची कारणे दिसून येतात. मगरींचा ज्या ठिकाणी अधिवासाला धोका उत्पन्न होत आहे, अथवा अधिवासच नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत अशा ठिकाणीच प्रामुख्याने मगरी जास्त आक्रमक होत असल्याचे दिसून येते.

मगरीचे खाद्य हे प्रामुख्याने नदीतील मासे, नदीत सोडलेली मृत जनावरे, कुत्री हे असून हे खाद्य विनासायास मिळत असताना मगरींचे मानवी जिवावर होत असलेले हल्ले हे चिंताजनक असले तरी याला कारणीभूत आपणच आहोत, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. नदीकाठाला मानवी संपर्क असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याची मागणी या परिसरातून होत आहे.

अन्य ठिकाणी पुनर्वसनाचा पर्याय

वनविभाग यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत उप वन संरक्षक प्रमोद धाणके यांनी सांगितले की, या परिसरात वावर असलेल्या मोठय़ा मगरींचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे हा यावर उपाय होऊ शकतो. यासाठी डेहराडून येथील संस्थेचे तज्ज्ञ डॉ. रमेश चिन्नास्वामी व डॉ. गोपी जी. त्रही. यांनी कृष्णा व वारणा नदीकाठी असलेल्या तुंग, डिग्रज, सांगली आणि कांदे येथे पाहणी केली आहे. वन विभागाने मानवावर होत असलेल्या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली असून यावर उपाय योजन्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रयत्न दीर्घकालीन असतीलच याची खात्री सद्य:स्थितीला देता येणार नाही. मगरींचे अस्तित्व मान्य करूनच संरक्षणाचा विचार करायला हवा.

नदीकाठी अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत. पंपाची देखभाल करण्यासाठी शेतकऱ्यांना नदीकाठी जावेच लागते, तर शेतीच्या कामासाठी तर दररोज जावेच लागते. अलीकडच्या काळात मासेमारीसाठी जिलेटिन कांडय़ासारख्या स्फोटकांचा वापर काही मंडळीकडून होत असून यामध्ये जलचर प्राण्यांच्या अस्तित्वाला धोकाही निर्माण झाला आहे. नदीकाठी मानवी संस्कृती स्थिरस्थावर झाली, यामध्ये अन्य प्राण्यांचे सहअस्तित्व गृहीत धरण्यात आले होते. बेसुमार वाळू व माती उपसा ही यामागील महत्त्वाची कारणे आहेत, या कारणांचाच जर बीमोड करता आला तर हा संघर्ष टाळता येऊ शकतो, मात्र यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन गस्त वाढवून अवैध वाळू उपसा माती उपसा रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:22 am

Web Title: need to take measures to avoid non human conflict in sangli area abn 97
Next Stories
1 वेध विधानसभेचे : भाजपसमोर काँग्रेसची चौकट भेदण्याचे आव्हान
2 #Chandrayaan2: राज ठाकरेंकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन
3 नारायण राणेंना हॅटट्रिक चुकवायची असेल तर निवडणूक लढू नये – दीपक केसरकर
Just Now!
X