मोहन अटाळकर

राज्यात करोनाचा संसर्ग कमी होत चालल्याचे चित्र असताना अमरावती जिल्ह्य़ात मात्र करोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. अचानकपणे रुग्णसंख्या वाढण्यामागे काय कारणे आहेत, याचा काथ्याकूट सध्या सुरू झाला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांकडे झालेले दुर्लक्ष यासाठी कारणीभूत मानले जात आहे.

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ८३५ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. २२ हजार ६३० रुग्ण बरे झाले आहेत. ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्युदर १.८६ टक्के आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एकूण १ हजार ९४८ करोनाबाधित आढळले असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

मार्च महिन्यापासून आतापर्यंत १ लाख ८७ हजार ६७२ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी १ लाख ६३ हजार ८९ जणांचे अहवाल नकारात्मक, तर २३ हजार ८३५ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सलग रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता कमालीची वाढली आहे. नागरिकांनी मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासन सातत्याने करीत आहे. गेल्या १ फेब्रुवारीला ९२ करोनाबाधितांची नोंद झाली. २ फेब्रुवारीला ११८, ३ फेब्रुवारीला १७९, ४ फेब्रुवारीला १५९, ५ फेब्रुवारीला २३३, ६ फेब्रुवारीला १९९, ७ फेब्रुवारीला १९२, ८ फेब्रुवारीला २३५, ९ फेब्रुवारीला १८३, तर १० फेब्रुवारीला हा आकडा अचानक वाढून ३५९ पर्यंत पोहचला. गेल्या दहा दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने जिल्ह्यात समूह संसर्गाची भीती आता व्यक्त व्हायला लागली आहे.

नव्याने बाधित झालेल्या एकूण रुग्णांपैकी ६० रुग्ण अचलपूर, तर १० रुग्ण तिवसा तालुक्यातील आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागातही करोनाचा संसर्ग वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

मार्च २०२० नंतर बाधितांची जी संख्या समोर आली त्यात दोनदा एकाच दिवशी ४०० ते ५०० रुग्ण बाधित झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता बुधवारी १० फेब्रुवारीला रोजी ३५९ जण करोनाबाधित झाले आहेत. संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आता सुपर स्पेशालिटीसह १० रुग्णालयांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य संचालकांनी एका करोनाग्रस्तामागे ३० निकटच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याचे निर्देश दिले असताना अमरावती जिल्ह्यात हे प्रमाण खूप माघारल्याने करोना संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. ७८१८ करोनाबाधित हे ग्रामीण भागातील आहेत. महापालिका क्षेत्रात २५५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर ग्रामीण भागात १६९ व्यक्ती करोनाचे बळी ठरले आहेत.

१०,८७४ जणांना लस

जिल्ह्य़ात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १०,८७४ लाभार्थीना लस देण्यात आलेली आहे. यासाठी केंद्रेदेखील वाढविण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील २१ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महसूलसह शासकीय यंत्रणांना करोनाची लस व काळजी घेण्याविषयी सूचना देण्यात येत आहेत. लक्षणेरहित रुग्ण बाहेर मोकळेपणाने वावरत आहेत. त्यामुळेही काही प्रमाणात संसर्ग वाढल्याची चर्चा आहे. करोना रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांचे पालन करण्यासोबतच ज्या भागात जास्त सकारात्मक रुग्णांची नोंद होत आहे, तेथे चाचण्या वाढविणे, याशिवाय रुग्णालयातील खाटांची स्थिती, औषधांचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सूचना आहेत.

कारवाईबाबत उशिरा जाग

* करोनाबाधितांची संख्या वाढू लागताच आता प्रशासनाने उशिरा का होईना कारवाईला सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि शिस्त न पाळणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथके गठित करण्यात आली आहेत.

* सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर कायम मुखपट्टी वापरणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. रस्ते, बाजार, रुग्णालय आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, मुखपट्टी न वापरल्यास पहिल्या वेळी पाचशे रुपये दंड, तर दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

* दुकानदार, फळे-भाजीपाला विकणाऱ्यांना तसेच सर्व ग्राहकांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. मध्यंतरीच्या काळात मात्र, ही कारवाई बंद होती.

अमरावती जिल्ह्य़ात करोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे. मुखपट्टीचा वापर, हातांची नियमित स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अशा सूचना प्रशासनामार्फत वारंवार दिल्या जात आहेत; पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना या नियमांचे पालन करण्यात आम्ही कुठे तरी कमी पडलो, त्यामुळेच करोना रोखण्यासाठी आता सर्वानीच पुढाकार घेऊन उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला हवे.

– डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती