अकोला जिल्हय़ातील धक्कादायक प्रकार; आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

अकोला : नवजात चिमुकलीला संक्रमित रक्त दिल्याने तिला ‘एचआयव्ही’ची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्हय़ात घडला. याप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे चिमुकलीला ‘एचआयव्ही’सारख्या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका दाम्पत्याला दर्यापूर येथे २३ ऑक्टोबर २०२० रोजी मुलगी झाली. या चिमुकलीची प्रकृती बिघडल्याने तिला जन्माच्या चार दिवसानंतर मूर्तिजापूर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत अवघाते यांच्याकडे दाखल केले. मुलीची प्रकृती चिंताजनक होत असल्याने विविध चाचण्या करण्यात आल्या. चिमुकलीच्या रक्तातील पेशी कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी अकोला येथील बी.पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आणण्यात सांगण्यात आले. त्या रक्तपेढीतून आणलेल्या रक्ताच्या दोन पेशव्या डॉक्टरांनी चिमुकलीला चढवल्या. चिमुकलीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने डॉक्टरांनी तिला अमरावती येथे दाखल करून आवश्यक त्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला. अमरावती येथे उपचारानंतरही चिमुकलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांना शंका आली. त्यामुळे त्यांनी त्या चिमुकलीची जुलै २०२१ मध्ये ‘एचआयव्ही’ चाचणी केली. यामध्ये त्या चिमुकलीचा तपासणी अहवाल सकारात्मक आला. डॉक्टरांनी त्या चिमुकलीच्या आई व वडिलांची ‘एचआयव्ही’ चाचणी केली. त्यामध्ये त्यांचा अहवाल नकारात्मक आला. त्या चिमुकलीवर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात एक महिना उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सुट्टी देण्यात आली. रक्तपेढीतून आणलेले संक्रमित रक्त दिल्यानेच चिमुकलीला ‘एचआयव्ही’ची बाधा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

दरम्यान, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणात रक्तदात्याकडून रक्त घेताना त्या रक्तपेढीने रक्ताची तपासणी केली नव्हती का? आणि हे रक्त खासगी दवाखान्यात त्या चिमुकलीला देताना, त्यावेळीही रक्ताची तपासणी का करण्यात आली? याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच अशा घटना समोर आल्यानंतर ‘एसबीटीसी’कडून त्वरित कारवाई केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

तीन विभागाकडून चौकशी सुरू 

चिमुकली ‘एचआयव्ही’ बाधित झाल्याप्रकरणी तीन विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व ‘एसबीटीसी’ मार्फत प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अकोला आरोग्य मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.