निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अलिबागमधील उमटे गावात ५८ वर्षीय व्यक्तीचा विजेचा खांब डोक्यात पडून मृत्यू झाला असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात कोणत्याही जीवीतहानीची नोंद झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “अलिबागमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उमटे गावात विजेचा खांब अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात कोणत्याही मृत्यूची नोंद झालेला नाही,” असं निधी चौधरी यांनी सांगितलं आहे.

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसला. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या घडल्या तर वीज पुरवठाही खंडीत झाला.

सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या. काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या. जिल्ह्यात १३ हजार ५४१ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं होतं.